राजस्थान काँग्रेसमधील बंडाळीचा श्रेष्ठींकडून ‘समाचार’, गेहलोत अध्यक्षपदाच्या रेसमधून बाहेर?

राजस्थान काँगेसमधील बंडाळीची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून याचा लेखी अहवाल द्यावा, असे आदेश सोनिया गांधी यांनी अजय माकन व मल्लिकार्जुन खरगे या दोन निरीक्षकांना दिले आहेत. दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी अशोक गेहलोत यांनाच राहू द्यावे आणि त्यांना काँग्रेस अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर काढावे, अशा निर्णयाप्रत काँग्रेस हायकमांड आले आहे.

गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांच्या जागी सचिन पायलट यांची नियुक्ती करावी, असा दिल्लीकरांचा आग्रह आहे. त्यातूनच रविवारी रात्री राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकविण्यात आले. पायलट यांना मुख्यमंत्री करू नये, अशी मागणी करत गेहलोत गटातील तब्बल 70 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

पक्ष निरीक्षक माकन आणि खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीलाही कुणी आमदार हजर राहिला नाही. त्यामुळे पेच आणखीनच वाढला. सोनिया गांधी यांनी आज तातडीने दोन्ही निरीक्षकांना दिल्लीला बोलावले आणि त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री पद आणि अध्यक्ष पद दोन्ही गेहलोत यांना हवे आहे. त्यासाठीच हा राजीनाम्याचा ड्रामा करण्यात आल्याचे काँग्रेस कार्यकारिणी समितीतील काही सदस्यांना ठाम वाटते.

नावावर फुली

राजस्थानमधील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांड गेहलोत यांच्या नावावर फुली मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत मुकूल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांची नावे चर्चेत आहेत. गेहलात समर्थकांनी ज्या अटी पक्षाला घातल्या त्या परिस्थितीला धरून नव्हत्या असे माकन यांनी बैठकीनंतर सांगितले. राजस्थानमधील घडामोडींची लेखी माहिती उद्यापर्यंत सोनिया गांधी यांना दिली जाईल, असेही ते म्हणाले.