गहलोत सरकारवर टांगती तलवार, उपमुख्यमंत्री पायलट दिल्लीत; 19 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

1463

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत सातत्याने भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत असताना सचिन पायलट मात्र दिल्लीत दाखल झाले आहेत. पायलट यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही दिल्लीत आहेत. पायलट भाजपच्या संपर्कात असून आपल्याला 19 आमदारांचा पाठिंबा आहे असे त्यांनी कळवल्याचे वृत्त, ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या माहितीवरून दिले आहे.

शनिवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत उपमुख्यमंत्री सचिन पायलट मात्र गैरसमज असल्याचे दिसले. त्यावेळी पायलट दिल्लीत होते. त्यांच्यासोबत काही आमदार देखील दिल्लीत असल्याचे वृत्त आहे. हे आमदार काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगणार असल्याचे बोलले जात आहेत. हे सर्व आमदार गुरुग्राम जवळ थांबल्याचे काँग्रेस आमदार जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वाद
2018 मध्ये राजस्थान राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर अशोक गहलोत आणि सचिन पायलट मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते. मात्र गहलोत यांना मुख्यमंत्री आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून दोघात वादाची ठिणगी पडली. सत्तेचे संतुलन राखण्यासाठी पायलट यांच्यावर राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एका फोन कॉलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वाद सुरू असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी भाजपच्या 2 नेत्यांना अटकही करण्यात आली. मात्र आता सचिन पायलट दिल्लीला पोहोचले असल्याने गहलोत सरकारवर टांगती तलवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या