राजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; अशोक गेहलोत यांचे `पाय लट’पटले!

642

देशात कोरोनाविरोधात युद्ध सुरू असतानाच मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानातही काँग्रेसचे सरकार अस्थिरतेच्या वाटेवर आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला असून पायलट यांनी 15 आमदारांसह थेट दिल्ली गाठली आहे. तिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ते भेट घेणार असल्याचे बोलले जात असतानाच भाजपचे खासदार जोतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याने राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच राजस्थानमधील भाजप नेत्यांकडून सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीआधी राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले. भाजपकडून काँग्रेस आमदारांना 25 कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून हे प्रकरण स्पेशल ऑपरेशन गु्रपकडे (एसओजी) सोपविण्यात आले. एसओजीकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही मंत्र्यांना नोटीस बजावली. या नोटीसीमुळे नाराज सचिन पायलट यांनी 15 आमदारांसह थेट दिल्ली गाठली. या समर्थक आमदारांना गुरगाम येथील आयटीसी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. नोटीसचे वृत्त चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी माध्यमांवर दाखविण्यात आले आहे. आमदार खरेदी प्रकरणाच्या चौकशीची मागणी काँग्रेसच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य व्हीप तसेच काही मंत्री आणि आमदारांनाही ही नोटीस आली असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे.

तीन अपक्ष आमदारांविरोधात एफआयआर

आमदारांना पैसे दिल्या प्रकरणात एसीबीने शनिवारी तीन अपक्ष आमदारांविरोधात एफआयआर दाखल केला. यामध्ये महुवा विधानसभेचे ओमप्रकाश हुडला, अजमेर किशनगढ येथून सुरेश टांक आणि पाली मारवाड जंक्शन येथून आमदार खूशवीर सिंह यांचा समावेश आहे.

सोनिया गांधींनी तीन नेत्यांना राजस्थानात धाडले राजस्थानातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सोनिया गांधी यांनी तीन नेत्यांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरला जाणाNया या नेत्यांमध्ये अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांचा समावेश आहे. हे तीन नेते काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करतील. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांनाही निर्देश दिले आहेत. सचिन पायलट हे आज रात्री जयपूरला पोहोचण्याची शक्यता आहे. पायलट काँग्रेसच्या या तीन नेत्यांसोबत बैठक करतील.

काँग्रेसमध्येच कलह – भाजप

गेहलोत सरकार स्थापन झाल्यापासूनच पायलट आणि गेहलोत यांच्यात मतभेद सुरू आहेत. काँग्रेसमध्यचे कायम कलहाचे वातावरण असून गेहलोत भाजपला दोष देत आहेत अशी टीका भाजप नेते खासदार ओम माथूर यांनी केली.

क्रेंद्राच्या इशाऱ्यावर काँग्रेसचे सरकार पाडण्याचा डाव – गेहलोत

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट भाजप नेत्यांवर आरोप केला असून भाजप नेते गुलाबचंद कटारिया, प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया आणि विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड यांच्याकडून क्रेंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार काँग्रेसचे सरकार पाडण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनासारखी भयानक स्थिती असताना भाजपकडून घाणेरडे राजकारण खेळले जात असल्याची टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे.

पुढील मुख्यमंत्री सचिन पायलट होतील का?

रास्थानमध्ये पुढील मुख्यमंत्री सचिन पायलट हातील अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. राजस्थान भाजप सरकार बनेल का? सचिन पायलट ज्योतिरादित्य सिंधिया ठरतील का? अशा चर्चांनाही सोशल मीडियावर ऊत आले असताना भाजपने मात्र पायलट यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.

हे गणित जुळले तरच…

जोतिरादित्य आणि पायलट यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री आहे. ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणेच राजस्थानमध्ये पायलट यांची अवस्था असल्याचे बोलले जात आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी गेहलोत यांच्याशी त्यांचे पटत नाही. त्यामुळे ते ज्योतिरादित्य यांच्या वाटेने जातील असे तर्वâ लढवले जात आहेत. काँग्रेसकडे सध्या 107 आमदार व 13 अपक्ष आणि एक राष्ट्रीय लोकदालाच्या आमदारासह 121 जणांचे बहुमत आहे. 200 जणांच्या विधानसभेत हे स्पष्ट बहुमत मानले जाते. मात्र भाजपच्या गोटातून सचिन पायलट यांना 24 आमदारांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. जर पायलट यांची नाराजी कायम राहिली आणि या 24 आमदारांनी राजीनामे दिले तर सरकार अल्पमतात येऊ शकते. अशा वेळी काँग्रेसची संख्या 83 वर येईल आणि जर अपक्ष आमदारांनीही साथ सोडली तर काँग्रेसचे सरकार संकटात येईल. बहुमताचा आकडा 89 वर येऊन 13 अपक्ष गळाला लावून भाजप सरकार बनवू शकते, असे आडाखे बांधले जात आहेत.

हे आमदार दिल्लीत पोहोचले

सुरेश टांक, महेंद्रजित सिंह मालवीय, ओमप्रकाश हुडला, राजेंद्र बुथडी, पीआर मीणा, रोहित बोहरा, चेतन डुडी आणि दानिश अबरार यांच्यासह 15 आमदार दिल्लीत पोहोचले आहेत.

काँग्रेसबाबत चिंता – सिब्बल

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसविषयी चिंता व्यक्त केली आहे. तब्येल्यातून घोडे पळवून नेल्यानंतर तरी जाग येईल का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या