‘भाजपात प्रवेश करणार नाही, गेहलोत यांच्याकडे बहुमत नाही’ – सचिन पायलट

राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. अशातच सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना यासंबंधित एक नवीन माहिती अमोर आली आहे. सचिन पायलट हे भाजपात प्रवेश करणार नसल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. तसेच पायलट यांनी गेहलोत यांनी केलेला बहुमताचा दावा फेटाळून लावला आहे.

सचिन पायलट म्हणाले आहेत की, ‘अशोक गहलोत सरकारकडे त्यांनी केलेल्या दाव्यानुसार बहुमत नाही.’ पायलट पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांची बाग ही बहुमत सिद्ध करण्याची जागा नाही, असे निर्णय विधानसभेत निश्चित केले जातात. दाव्यानुसार त्यांच्याकडे बहुमत असल्यास त्यांनी आमदारांची पूर्ण संख्या का जाहीर केली गेली नाही,’ असा सवाल सचिन पायलट यांनी उपस्थित केला आहे.

गहलोत गटाचा दावा, 106 आमदार आहेत सोबत

राजस्थान कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 106 आमदार उपस्थित होते, असा दावा काँग्रेस पक्षातील सूत्रांनी केला असल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी बंड पुकारले ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये सरकार विरोधी आणि पक्षविरोधी कार्यात सहभागी असणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी उपस्थित आमदारांनी केली. उपमुख्यमंत्री पायलट व त्यांचे जवळचे मानले जाणारे आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या