राजस्थानात काँग्रेस आणि भाजपातील राजकीय घडामोडींना वेग!

3112

राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकणे ही सरकारची प्राथमिकता असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत अधिवेशनाची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. भाजपने गुजरातला गेलेल्या आमदारांना परत बोलावले असून सर्व आमदार अधिवेशन होईपर्यंत जयपूरमध्येच राहणार आहेत.

राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. त्यातच सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविल्याने राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 14 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराक जिंकणे ही गेहलोत सरकारची प्राथमिकता आहे. यासाठी काँग्रेसने के.सी. वेणुगोपाल, अविनाश पांडे, गोविंदसिंह डोटासरा, महेश जोशी या प्रमुख नेत्यांची एक टीम तयार केली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी रविवारी जैसलमेर येथे संबंधितांची बैठक घेऊन अधिवेशनातील फ्लोअर मॅनेजमेंटबाबत चर्चा केली.

काँग्रेसचे हे नेते सांभाळणार मोर्चा

विधानसभेत संसदीय कार्यमंत्री शांती धारीवाल हे नेतृत्व करतील. ते धोरणात्मक पैलूंबद्दल बोलतील. डॉ.बी.डी. कल्ला धारीवाल यांना सहकार्य करतील. महेश जोशी आणि महेंद्र चौधरी यांच्यावर आमदारांच्या उपस्थितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गोविंद सिंह डोटसरा विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांच्या हालचालीवर लक्ष ठेवतील.

11 ऑगस्टला भाजपची बैठक

भाजपसाठी 14 ऑगस्टचा दिवस हा निर्णायक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांची 11 ऑगस्टला बैठक बोलावली असून त्यानंतर सर्वांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

भाजपला आमदार फुटण्याची भीती

गेहलोत सरकार संकट आल्यास भाजपा आमदारांना फोडायचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपनेही आपले आमदार सुरक्षित कसे राहतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरातला गेलेल्या आमदारांनाही भाजपने पुन्हा बोलावले असून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वांना जयपूरला थांबण्यास सांगण्यात आले आहे.

तुम्ही सत्याची साथ द्या; गेहलोत यांचे सर्व
आमदारांना पत्र

निवडणुकीत जय-पराजय तर होतच असतो आणि जनतेचा निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे. राजस्थानात हीच परंपरा आहे. तुम्ही सर्वांनी सत्याची साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व आमदारांच्या नावे पत्र लिहून केले आहे. कर्तमान स्थितीत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीकरून जनतेत संतापाची भावना आहे. हे पाहता जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आपल्याला चुकीच्या परंपरांपासून दूर राहावे लागणार आहे. सर्वसामान्य लोकांचा आवाज ऐकून लोकांनी निवडून दिलेले सरकार काम करत राहील असे सुनिश्चित केले पाहिजे असेही गहलोत यांनी पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या