काँग्रेस आक्रमक; पायलटांना उतरविले! राजस्थानात राजकीय ‘रण’

1528

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षात थारा नाही असा आक्रमक पवित्रा घेताना काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच पायलट समर्थक दोन मंत्र्यांनाही हाकलले आहे. बंडच्या कॉकपिटमधून पायलटनाच उतरविल्यामुळे राजस्थानातील राजकीय ‘रण’ने नाटय़मय वळण घेतले असून, काँग्रेस पक्षाने भाजपच्या ‘ऑपरेशन कमल’च्या घोडेबाजाराला जोरदार दणका दिला आहे. दरम्यान, आपले सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचले होते आणि त्यात पायलट सहभागी होते असा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

राजस्थानातील काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपच्या षडयंत्रात सचिन पायलट सहभागी झाले होते, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. भाजपने घोडेबाजार सुरू केल्याची कल्पना आम्हाला होती. भाजप देशभरात घोडेबाजार करीत आहे. अखेर पक्षश्रेष्ठीनी यावर निर्णय घेतला आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून दूर केले, असे त्यांनी सांगितले. देशात असे एक सरकार आहे जे राज्यांमधील विरोधी पक्षांचे सरकार पाडण्यासाठी पैशाचा वापर करीत आहे, असा गंभीर आरोप गेहलोत यांनी केंद्र सरकारवर केला. भाजप सर्व खेळ खेळत आहेत. आणि पायलट त्यात सहभागी आहेत, असे गेहलोत यांनी सांगितले.

सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नही

उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सचिन पायलट यांनी सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नही, अशी पहिली प्रतिक्रिया ट्विट केली. त्यानंतर त्यांनी समर्थकांचे आभार मानणारे ट्विटही सायंकाळी केले.

इतकी तरी अक्कल भाजपला दिली असेल!

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा आणि बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी केली आहे. त्यावर विश्वासदर्शक ठरावाची मागणी केव्हा आणि कशी केली जाते, हे समजण्याइतकी तरी अक्कल देवाने त्यांना दिली असेल, असा टोला मुख्यमंत्री गेहलोत यांनी लगावला.

26 व्या वर्षी खासदार, 32 व्या वर्षी मंत्री

काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांना काय नाही दिले? पायलट यांना अवघ्या 26व्या वर्षी खासदार केले. 32व्या वर्षी केंद्रात मंत्रिपद दिले. 34व्या वर्षी राजस्थानात प्रदेशाध्यक्षपद दिले. 40व्या वर्षी उपमुख्यमंत्रीपद दिले. अवघ्या 16-17 वर्षांत एवढे सगळे पक्षाने दिले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पायलट यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. तरीही ते काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले. हे सहन केले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिला. भाजपच्या कारस्थानाला बळी पडून पायलट हे काँग्रेस सरकार पाडण्याच्या कटात सहभागी झाले हे अत्यंत दुःखद आहे, असेही ते म्हणाले.

सरकारला धोका नाही

पायलट आणि त्यांच्या दोन समर्थक मंत्र्यांना हटविल्यामुळे गेहलोत सरकारला धोका नसल्याचे चित्र आहे. कारण पायलट यांच्याबरोबर केवळ 5 ते 7 आमदार असल्याची शक्यता आहे.

राजस्थान विधानसभेचे संख्याबळ 200 आहे. त्यात काँग्रेसचे 107, भाजप 72, भाजप समर्थक आरएलपीचे 3 आमदार आहेत. अपक्ष 13 आणि इतर 5 आमदार आहेत.

गेहलोत यांना काँग्रेस आणि अपक्ष व इतर मिळून 124 आमदारांचा पाठिंबा आहे. यात पायलट समर्थक 5-7 आमदार कमी झाले तरी गेहलोत सरकारकडे पूर्ण बहुमत आहे.

 • गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेशप्रमाणे राजस्थानातही ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याचा डाव भाजपने टाकला होता. सचिन पायलट यांना हाताशी धरून भाजपने चाल खेळली. पण भाजप आणि पायलट यांचा डाव फसल्याचे सोमवारीच स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीत काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार मिळून 109 आमदार हजर होते. त्यामुळे गेहलोत सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याचे स्पष्ट झाले होते.
  काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

  जयपूर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी झाली. त्यासाठी पक्षाच्या सर्व आमदारांना व्हिप बजाविण्यात आला. दोन दिवसांतील ही दुसरी बैठक होती.

  सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवितानाच त्यांचे समर्थक मंत्री विश्वेंद्र सिंह आणि राजेश मिना यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला, अशी माहिती पक्षाचे निरीक्षक आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  सचिन पायलट यांच्याकडे दीर्घकाळ राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते. त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी केली आहे.

  पक्षविरोधी कारवाया करणाऱया बंडखोरांना स्थान दिले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा संदेश काँग्रेसने दिला आहे.

  बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आणि निर्णयाची माहिती दिली. पायलट आणि दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर करण्याची विनंती राज्यपालांकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या