राजस्थानने उडवला कोलकात्याचा धुव्वा; विक्रमी अर्धशतकासह यशस्वीची 98 धावांची खेळी

इडनवर झालेल्या यशस्वी जैसवालच्या स्पह्टात यजमान कोलकाता बेचिराख झाला. 13 चेंडूंत विक्रमी आणि वेगवान अर्धशतक आणि 47 चेंडूंत केलेल्या नाबाद 98 धावांच्या यशस्वी खेळीने राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढवल्या. राजस्थानने कोलकात्याचे 150 धावांचे आव्हान 13.1 षटकांत केवळ एक विकेट गमावतच पार पाडले. वानखेडेवर 62 चेंडूंत 124 धावांची झंझावाती खेळणाऱया यशस्वीला आजही शतकाची संधी होती. त्याला शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकायचा होता, पण तो चौकार झाला आणि यशस्वी 98 धावांवर नाबाद राहिला. त्याने 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तसेच संजू सॅमसनबरोबर त्याने 121 धावांची अभेद्य भागीही रचली. संजूने 48 धावांत 5 षटकार आणि 2 चौकार खेचले.

यशस्वीचा झंझावात

आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत यशस्वीने आक्रमक सुरुवात केली. याआधी विराटने अशी फटकेबाजी केली होती. यशस्वीने नितीश राणाच्या पहिल्या षटकांतच 6, 6, 4, 4, 2, 4 अशा फटक्यांसह 26 धावा चोपल्या. मग हर्षित राणाच्या चेंडूवर एक धाव काढली. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या षटकांत 4, 6, 4, 4, 4 आणि 1 अशा धावा वसूल करत त्याने 13 व्या चेंडूंवर आपले विक्रमी अर्धशतक साकारले. याआधी के. एल. राहुल आणि पॅट कमिन्स यांनी 14 चेंडूंत 50 धावा ठोकल्या होत्या. 11 चेंडूंत 45 धावा करणाऱया यशस्वीला 12 व्या चेंडूवर षटकार ठोकून युवराज सिंगच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती, पण तो चौकार ठोकू शकला.

तत्पूर्वी, युजवेंद्र चहलच्या फिरकीपुढे कोलकात्याची फलंदाजी 149 धावांपर्यंत मजल मारू शकली. ट्रेंट बोल्टने आपल्या पहिल्या दोन षटकांतच जेसन रॉय (10) आणि रहमानुल्लाह गुरबाज (18) यांना बाद करून कोलकाताला जबर धक्का दिला.  मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाने 48 धावांची भागी केली.

चहलच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट

चहलने जमलेली जोडी पह्डत आपल्या फिरकीची कमाल दाखवली. राणाला बाद करत त्याने ड्वेन ब्राव्होच्या आयपीएलमधील 183 विकेटस् च्या विक्रमाला मागे टाकले. मग व्यंकटेशने 42 चेंडूंत 57 धावा ठोकत कोलकात्याच्या धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न केला, पण चहलनेच त्यालाही बाद केले आणि त्यानंतर रिंकू सिंह (16) आणि शार्दुल ठाकूर (1) यांनाही बाद करून कोलकात्याला दीडशेही करू दिले नाही.