भावाच्या आत्महत्येनंतर वडिलांचा कोरोनाने मृत्यू, राजस्थानच्या गोलंदाजावर दु:खाचा डोंगर कोसळला

इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चेतनचे वडील कांजीभाई सकारिया यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजस्थान रॉयल्सने ट्वीट करून ही दु:खद माहिती दिली.

‘कांजीभाऊ सकारिया कोरोनाशी झुंज हरले हे सांगताना खूप दु:ख होत आहे. आम्ही चेतन सकारियाच्या संपर्कात असून या कठिण प्रसंगामध्ये त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांची जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करू’, असे ट्वीट राजस्थान रॉयल्सने केले आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगची सुरुवात झाल्यानंतर चेतन सकारिया याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्याने सर्व पैसा वडिलांच्या उपचारासाठी पाठवला होता. घरामध्ये आपण एकटेच कमावते असून आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांमधून वडिलांचे उपचार सुरू असल्याचे चेतन सकारिया याने म्हटले होते.

कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम स्थगित झाल्यानंतर चेतन सकारिया याने भावनगरमधील आपल्या घरी धाव घेतली होती. त्याचा जास्तीत जास्त वेळ रुग्णलयात वडिलांचे सेवेत जात होता. पीपीई किट घालून तो वडिलांना पाहण्यासाठी रुग्णालयातही गेला होता. परंतु दुर्दैवाने रविवारी उपचारादरम्यान त्याच्या वडिलांची प्राणज्योत मालवली.

भावाची आत्महत्या

दरम्यान, चेतन सकारिया याच्या कुटुंबाने 6 महिन्यामध्ये दोन खंदे सदस्य गमावले. याआधी जानेवारी 2021 मध्ये सकारिया याच्या भावाने आत्महत्या केली होती, त्यावेळी सकारिया सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता. स्पर्धा संपल्यानंतर त्याला भावाच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या