सामूहिक बलात्कार करून सोशल मीडियावर केला व्हिडीओ व्हायरल 

1395
प्रातिनिधीक फोटो

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अलवर जिल्ह्यातील लक्ष्मनगढ येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या नराधमांनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. महिलेने याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे 9 वर्षांपूर्वी भरतपूर जिल्ह्यात लग्न झाले होते. महिलेच्या दिराने 1 वर्षांपूर्वी महिलेचा मोबाईल नंबर एका नातेवाईकाला दिला होता. हा नातेवाईक महिलेला वारंवार फोन करून त्रास देत होता. मात्र काही दिवसानंतर महिला या नातेवाईकाशी फोनवर बोलू लागली होती. याच दरम्यान काही कामानिमित्त महिला गोपालगढ येथे गेली असता तिथे तिला हा नातेवाईक भेटला. यावेळी त्याने महिलेला कुठे जात आहे, असे विचारले. त्यावर महिलेने माहेरी जात असल्याचे या इसमाला सांगितले. या इसमाने या महिलेला मीही त्याच भागात जात आहे. तुम्हाला वाटेत सोडतो, असे सांगितले. यावर महिला या इसमसोबत जाण्यास तयार झाली. यानंतर या इसमाने महिलेला एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कारानंतर या इसमाने महिलेला तिच्या माहेरी सोडले आणि ‘कोणास काही सांगितल्यास तुझी बदनामी करू’, अशी धमकी दिली. महिलेने बदनामीच्या भीतीपोटी कोणाला काहीही सांगितले नाही. यानंतर या इसमाने एका अन्य नातेवाईक आसिफ याला या महिलेचा मोबाईल नंबर दिला. आसिफने महिलेला फोन करत ‘आपण जिथे बोलवत आहोत तिथे ये, अन्यथा तुझ्यावर झालेल्या बलात्काराबद्दल सर्वाना सांगून तुझी बदनामी करू,’ अशी धमकी दिली. आसिफने बोलावलेल्या ठिकाणी महिला गेली असता त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आसिफने महिलेला बकरी ईदच्या एक दिवस आधी पुन्हा एका ठिकाणी बोलावले. या ठिकाणी महिला गेली असता तिथे आसिफसह आणखीन चार जणांनी महिलेवर बलात्कार केला. यानंतर या नराधमांनी महिलेचे नग्न अवस्थेत चित्रीकरण करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियावर आपला अश्लील व्हिडीओ पाहून महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या