संतापजनक..रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रेमडेसीवीर चोरले..रुग्णांना दिले पाण्याचे इंजेक्शन

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या जिवावर बेतणारी एक घटना उघडकीस आली आहे. कोरोना रुग्णांसाठी जीवदान ठरणारे रेमजेसीवीरचे इंजेक्शन रुग्णालयातील कर्मचाऱ्याने चोरले. त्यानंतर रुग्णाला चक्क पाण्याचे इंजेक्शन देण्यात आल्याची घटना राजस्थानच्या कोटामध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच रेमडेसिवीर इंजेक्शन चोरुन रुग्णांना पाण्याने भरलेले इंजेक्शन दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन भावांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले आहेत. मनोज आणि राकेश असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही आरोपी बुंदी जिल्ह्यातीसल निमोदा येथील रहिवासी असून सध्या ते महावीर नगरमध्ये राहतात.

मनोज रेगर हार्ट रुग्णालयात कोविड विभागात होता. त्याने रतनलाल आणि माया नावाच्या व्यक्तींची रेमडेसीवीर इंजेक्शन चोरली आणि त्यांना पाण्याने भरलेले इंजेक्शन दिले. त्यानंतर चोरलेले इंजेक्शन जास्त किंमतीत विकण्यासाठी स्वत:जवळ ठेवले. मनोजचा भाऊ राकेश रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या एका लॅबमध्ये काम करतो. तो कोविड विभागात सॅम्पल घेण्यासाठी जा-ये करत असतो. हे दोघं रेमडेसिवीरचा काळाबाजार करत होते.

कोटा मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय सरदाना यांना काही खासगी रुग्णालयातील स्टाफ रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने डॉक्टरांनी ग्राहक बनून दोघांशी संपर्क साधला आणि त्यांना भेटायला बोलावले असता पोलिसांनी त्या दोघांना रंगेहात अटक केली. 15 मे ला दोघांना अटक करण्यात आली आहे. मनोज पोलीसांच्या ताब्यात असून राकेशची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या