राजदीप सरदेसाईंवर कारवाई; दोन आठवड्यांसाठी ऑफ एअर, महिन्याचा पगारही कापणार

इंडिया टुडेने वरिष्ठ वृत्तनिवेदक आणि सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर कारवाई केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वृत्त दिल्याने त्यांना दोन आठवड्यांसाठी ऑफ एअर करण्यात आले आहे. या काळात ते कोणत्याही बातमीपत्रांचे वृतनिवेदन करणार नाहीत. तसेच त्यांचा एक महिन्याचा पगार कापण्याची कारवाई करण्यात आली आहे. सरदेसाई यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, वृत्तवाहिनीने त्यांच्यावर कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

वृत्तवाहिन्यांची स्पर्धा आणि ब्रेकिंग न्यूजच्या नादात अनेकदा चुकीचे किंवा खोडसाळपणाचे वृत्त देण्यात येते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची माहिती देणारे ट्विट केले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवी दिल्लीत 26 जानेवारी रोजी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीत दिल्ली पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा सरदेसाई यांनी ट्विटमध्ये केला होता. दिल्ली पोलिसांच्या गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

26 जानेवारी रोजी तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी राकेश टिकैत, दर्शन पाल आणि गुरनामसिंग चंदूनी यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढली. या ट्रॅक्टर रॅलीवेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. त्यात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या हिसंचारप्रकरणी 37 शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केल्याचा आणि त्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, “ पोलिसांच्या गोळीबारात एका 45 वर्षीय नवनीत या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे ‘बलिदान’ व्यर्थ ठरणार नाही, अशा भावना शतेकरी आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत ” या शेतकऱ्याला पोलिसांनी गोळ्या घालल्याचा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी या ट्विटची दखल घेत या शेतकऱ्याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याबाबतचा व्हिडीओही जारी केला.

व्हिडीओमध्ये एक ट्रॅक्टर पोलिसांचे बॅरिकेट तोडून वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकांचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे नवनीत या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरावर गोळीबाराच्या कोणत्याही खूणा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी व्हिडीओ जारी केल्यानंतर काही मिनिटांनी सरदेसाई यांनी आपले ट्विट डिलीट केले. “नवनीतसिंगला दिल्ली पोलिसांनी गोळ्या घातल्याचा आंदोलकांचा दावा फोल आहे. पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आले की ट्रॅक्टर बॅरिकेट तोडून जात असताना तो उलटला. त्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. लाल किल्ला आणि आयटीओ येथे पोलिसांनी संयम दाखवला, असेही सरदेसाई यांनी नवे ट्विट केले.

सरदेसाई यांनी खोटे ट्विट पसरवल्याबाबत त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या