
मिंधे गटाचे खासदार राजेंद्र गाकित यांनी फसवणुकीची हद्द ओलांडली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठी एका वृद्ध दाम्पत्याकडून घेतलेले 15 लाख रुपये त्यांनी बुडवले आहेत. या लुबाडणूकप्रकरणी रोहिंटन तारापोरवाला यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गावित यांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
डहाणू तालुक्यातील बावडा येथे राहणारे रोहिंटन तारापोरवाला (76) आणि त्यांची पत्नी होमाई (74) यांच्याकडून राजेंद्र गावित यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 15 लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यावेळी गावित यांनी तारापोरवाला यांना पुढील तारखेचा धनादेश दिला होता. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मात्र गावित यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तारापोरवाला यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये धनादेश टाकला मात्र तो वठलाच नाही. त्यानंतर गावित यांना तारापोरवाला यांनी नोटीस पाठवली. त्यानंतर गावित यांनी तारापोरवाला यांना 9 लाख रुपये दिले. मात्र बाकीचे सहा लाख रुपये देण्यासाठी गावित यांनी नकार दिल्यानंतर जून 2021 मध्ये तारापोरवाला दाम्पत्याने काणगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र गावित यांच्याकिरुद्ध तक्रार केली. मात्र हा नागरी वाद असल्याचे सांगून फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला होता. यामुळे तारापोरवाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गावित यांना नोटीस धाडली असून 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.
उलटा चोर कोतवाल को डाटे
गावित यांच्या सांगण्यावरून सहाय्यक रजिस्टार यांनी तारापोरवाला यांच्या घरावर छापा टाकून अवैध पद्धतीने कर्जवाटप करण्याचा गुन्हा दाखल केला. गावित यांच्याकडून होणाऱया त्रासाची कैफियत मांडण्यासाठी तारापोरवाला यांनी पोलीसांकडे धाव घेतली. मात्र गावित यांच्या दबावामुळे तक्रारीची दखल घेतली नाही, असे तारापोरवाला यांनी याचिकेत म्हटले आहे.