महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात बोलल्याने त्यांनी गुंडांकडून माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्या जीवितास काही धोका झाल्यास याला सर्वस्वी राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे यांनाच जबाबदार धरण्यात यावे, असे लेखी निवेदन शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षक ओला यांना दिले आहे. यामुळे खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्या विरोधात बोलल्याने आणि शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केल्यानंतर मंत्री विखेंनी अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढून घेतले, असा आरोप पिपाडा यांनी केला. पोलीस संरक्षण पुन्हा मिळण्याबाबत आपण 14 ऑगस्टला पत्रही दिल्याचे ते म्हणाले.
विखेंनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रयत्न सुरू केले आहेत. 16 ऑगस्ट रोजी विखेंच्या लोणी जवळील चंद्रापूर गावात एकादशीच्या दिवशी कुटुंबीयांच्यावतिने महाप्रसादाची पंगत होती. याला पत्नी व कुटुंबीयांसह उपस्थित राहिलो. किर्तन सुरू असताना विखेंनी त्यांचे गुंड हल्ला करण्यासाठी पाठवले. मात्र इतरांनी मध्यस्थी केल्याने वाचलो. विखे पिता-पुत्र इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत, असा आरोपही पिपाडा यांनी केला.
शिर्डी मतदारसंघात विखेंच्या चार-चार पिढ्यांनी राज्य केले, तरी विकासाचा कुठलाही मागमूस नाही. बेरोजगारांच्या फौजा वाढत असून तरुणांच्या हाताला काम नाही. सोसायटी त्यांच्याकडे, ग्रामपंचायत त्यांच्याकडे, जिल्हा बँक यांच्याकडे, दूध सोसायटी यांच्याकडे, साखर कारखाने, बाजार समिती, मंत्रीपदं आणि खासदारकीही यांच्याकडे. सत्तेचा वापर करून लोकांना धमकवायचे, जनतेला गुलाम बनवायचे, विरोधकांच्या सभेला गेल्यास त्याला ऊस उचलायचा नाही, बँकेकडून कर्ज मिळून द्यायचे नाही हा प्रकार सगळ्यांनी पाहिला आहे, असा आरोपही पिपाडा यांनी केला.
माझ्या विरोधात खोटे खटले दाखल करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण विखेंच्या झुंडशाीह आणि गुंडगिरीविरोधात लढा सुरुच ठेवेल. सत्तेची दहशत मोडून काढली पाहिजे. विखेंनी मला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते पुढे म्हणाले.