शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावणार – राजेश टोपे

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक आरोग्य विषयक प्रश्न रखडलेले होते. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून गुरुवारी मंत्रालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लावून धरली. यावर बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी जिल्ह्यात 9 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व 58 उपकेंद्र स्थापित करणे गरजेचे आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव 31 जानेवारी पूर्वी सादर केले जातील, असे आरोग्य सहसंचालक यांनी सांगितले. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची अडचण असेल त्यासंदर्भात मला अवगत करावे, तो प्रश्न देखील आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ निकाली काढू, असे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.

यावेळी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी निधी वितरित करण्यात आला असून त्यासंदर्भातील निविदा तात्काळ काढण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच आरोग्य अधिकारी कर्मचार्‍यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री टोपे यांनी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांना दिले. त्यामुळे आता जिल्ह्यातील अनेक आरोग्य विषयक समस्या मार्गी लागणार आहे. यावेळी आरोग्य सचिव, आरोग्य आयुक्त संचालक, आरोग्य सहसंचालक यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या