म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार- राजेश टोपे

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने बाधित होत असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे टोपे यांनी सांगितले. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनदेखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या