रजनीकांतचा ४५० कोटींचा २.० सिनेमा

7

सामना प्रतिनिधी । मुंबई

तब्बल ४५० कोटी बजेट असलेल्या रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ या आगामी चित्रपटाचे शानदार म्युझिक लाँच काल दुबईतील बुर्ज पार्कमध्ये झाले. रजनीकांत आणि त्याच्या या अत्यंत महागडय़ा चित्रपटाची सुरुवातीपासूनच हवा आहे. त्यामुळेच रजनीच्या चाहत्यांनी अगदी सहा लाख रुपये मोजून म्युझिक लाँच इव्हेंटचे टेबल बुक केले. या सोहळ्यानिमित्त बुर्ज पार्कमध्ये मंतरलेली रात्र रसिकांनी अनुभवली.

दिग्दर्शक एस. शंकर यांच्या ‘२.०’ सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच कोटय़वधींची कमाई केली आहे. एस. शंकर हे आपल्या चित्रपटांच्या ग्रँड इव्हेंटसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी ‘आय’ या चित्रपटाच्या लाँचिंगला तर थेट हॉलीवूड सुपरस्टार अर्नाल्ड श्वार्झनेगरला बोलावले होते. आता तर ‘२.०’ सिनेमाचे प्रमुख शहरांत इव्हेंट होणार आहेत. बुर्ज पार्कमध्ये काल त्याची एक झलक बघायला मिळाली. या कार्यक्रमाला रजनीकांत, अक्षय कुमार, एमी जॅक्सन, ए. आर. रहेमान, राणा डुग्गुबती आणि करण जोहर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी हजर होत्या. यावेळी एमी जॅक्सन आणि तमन्ना भाटिया यांचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला. ए. आर. रेहमानने सिंफनी म्युझिशियनसोबत गाणे सादर केले.

मुंबईतही मेगा इव्हेंट होणार

बहुचर्चित ‘२.०’ ची टीम मुंबईतही धमाकेदार परफॉर्मन्स करणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या सिनेमाचे शूटिंग झाले हेते. त्यामुळे तिथेही ग्रँड इव्हेंट होणार नाही. १५ भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘२.०’  महागडा का?

  • सिनेमात सुपरस्टार रजनीकांत, एमी जॅक्सन आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
  • संपूर्ण सिनेमा थ्री डी कॅमेऱयाने शूट केलेला आहे. थ्रीडीमध्येच रिलीज होणार आहे.
  • हॉलीवूडचे प्रसिद्ध  कॉश्च्यूम डिझायनर रोर रॉड्रिग्ज यांनी ‘२.०’  सिनेमातील व्यक्तिरेखांचे डिझाइन केले आहे.
  • आतापर्यंत ‘असुरा’ हा चिनी भाषेतील सिनेमा आशियातील सर्वाधिक महागडा सिनेमा आहे. त्याचे बजेट ६८० कोटी आहे.
आपली प्रतिक्रिया द्या