३२४ वर्षांचा झाला ‘हा’ तरुण अभिनेता

सामना ऑनलाईन । मुंबई

मथळा वाचून गोंधळात पडला असाल.. पण, थांबा.. हे काही प्रत्यक्षात घडलं नसून ही सारी मेकअप तंत्राची जादू आहे. त्याचं झालं असं की सुशांत सिंग राजपूतच्या आगामी राबता या चित्रपटाची कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. त्यामुळे पूर्वजन्मातली एक व्यक्तिरेखा ३२४ वर्षांची असून ते साकारणारा अभिनेता राजकुमार राव मात्र अवघा ३२ वर्षांचा आहे.

आगामी ‘राबता’ सिनेमात राजकुमारने या जख्ख म्हाताऱ्याची भूमिका साकारली आहे. ‘क्वीन’ आणि ‘ट्रॅप्ड’ या सिनेमांमधील दमदार अभिनयानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर तो या हटके भूमिकेत दिसणार आहे. सुशांतसिंग राजपूत व कृती सेनन यांच्या अभिनयापेक्षा राव याच्या या लूकचीच सध्या बॉलिवूडमध्ये अधिक चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर दाखविण्यात आला. त्यावेळी त्याला कोणी ओळखू शकलं नाही. त्यानं स्वत: ट्विट करून हा रहस्यभेद केला. प्रोस्थेटिक मेकअपच्या सहाय्यानं त्याचा चेहरा आरपार बदलण्यात आला आहे. या व्यक्तिरेखेसाठी ‘फायनल लूक’ निवडण्यापूर्वी जवळपास १६ प्रकारच्या मेकअप लूक टेस्ट कराव्या लागल्या. खास लॉस एंजलिसहून रंगभूषाकारांची टीम बोलावण्यात आली होती.

याविषयी बोलताना दिग्दर्शक दिनेश विजन म्हणाले, ‘ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला मेकअपसाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. ३२ वर्षांच्या राजकुमारला ३२४ वर्षांचा वृद्ध दाखवणं अतिशय अवघड होतं. पण त्याने तं केलं. दिसण्याप्रमाणंच वृद्ध व्यक्तीचा आवाजही हुबेहूब यावा यासाठीही राजकुमारने आवाजावरही खूप मेहनत घेतली आहे.’