आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांची तब्येत खालावली

134

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणांपैकी एकही आश्वासन न पाळता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली ‘आत्मक्लेश यात्रा’ आज नवी मुंबईत पोहोचली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, घामाच्या धारा अशा अवस्थेत पदयात्रा करणाऱ्या शेट्टी यांचे पाय सुजले असून त्यांच्या तळपायाला फोडही आले आहेत. त्यांना रक्तदाबाचाही भयंकर त्रास जाणवू लागला असून शरीरातील पाणीही कमी होऊ लागले आहे. शेट्टी यांची प्रकृती खालावू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र काहीही झाले तरी येत्या ३० मे रोजी ‘राजभवन’वर धडकणारच असा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी २२ मे पासून आत्मक्लेश यात्रा सुरू केली आहे. पुण्यातून पायी निघालेले शेट्टी खंडाळामार्गे आज पनवेल आणि तेथून नवी मुंबईत दाखल झाले. भयंकर उष्णतेचे चटके लागत असूनही त्याची पर्वा न करता शेट्टी यांची यात्रा सुरूच आहे.

उष्णतेमुळे शेट्टी यांच्या शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यांचे पाय सुजले आहेत. तळपायालाही फोड आले आहेत. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. नवी मुंबईत आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. ३० मे ऐवजी आणखी दोन दिवस उशिरा मुंबईत पोहोचा, असे डॉक्टरांनी सांगितले.

मोंदीनी ‘बाहुबली’सारखे काय केले ते सांगा

‘खोटे बोल, पण रेटून बोल’ असा मोदी आणि फडणवीस सरकारचा कारभार सुरू आहे. त्यांनी शेतकऱ्यांना किती शेततळी दिली याची माहिती जाहीर करावी, किती शेतकऱ्यांना सोलरपंप मिळाले याचा लेखाजोखा द्यावा, विजेची बिले भरमसाट वाढवून ठेवली आणि वीज मात्र गायब केली. शेतकरी याला वंâटाळले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून पंतप्रधान मोदींना ‘बाहुबली’ बनविण्याचा आटापिटा सुरू आहे. मोदींनी बाहुबलीसारखे काय काम केले ते सांगा, असा घणाघाती सवाल राजू शेट्टी यांनी केला. नुसत्या जाहिरातबाजीवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

रांगत जाऊ, सरपटत जाऊ, पण ३० तारखेलाच पोहोचू

शेतकऱ्यांचा आक्रोश राज्यपालांपर्यंत पोहोचविण्याचा माझा निर्धार आहे. माझ्या प्रकृतीचे काहीही होवो. मी रांगत जाईन, सरपटत जाईन, पण ३० तारखेलाच ‘राजभवन’वर पोहोचेन. माझ्या आत्मक्लेश यात्रेत कोणताही बदल होणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या