सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या-खासदार राजू शेट्टी

60

सामना ऑनलाईन, नाशिक

कर्जमाफी असो की समृध्दी महामार्गाचे भूसंपादन असो याबाबत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केला. दुसऱया सत्रात खासदार शेट्टी यांनी शेतीप्रश्नांवर मार्गदर्शन केले.  शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती तसेच वीज बिल माफी मागण्याची वेळ का आली याच्या मुळाशी गेलेच पाहिजे, असे ते म्हणाले. सन २०१४ ला महायुती होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची मागणी केली. सरकार आल्यानंतर मागणी पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले. ते आश्वासन वेळीच पाळले असते तर शेतकऱ्यांवर कर्जच राहिले नसते. कर्जमुक्तीप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अभ्यासाच्या गोष्टी करतायेत. हेच फडणवीस काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात सातबारा कोरा करण्याची भाषा करीत होते. सत्तेत येताच त्यांची भाषा बदलली आहे, असे सांगतानाच राज्यातील शेतकऱ्यांनीच भाजपला सत्तेच्या खुर्च्या दिल्या त्या काढून घेण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

लांब पल्ल्याचे कृषीविषयक निर्णय घ्या – विनायकदादा पाटील

शासनाने सर्वप्रथम दहा वर्षे कालावधीचे कृषीविषयक धोरण तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले. शिवसेनेच्या कृषी अधिवेशनातील दुसऱ्यां सत्राच्या प्रारंभी विनायकदादा पाटील यांनी शेतीप्रश्नी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनातून प्रयत्न होत असल्याचा आनंद वाटतो असे ते म्हणाले. निसर्ग, शासन, वित्तीय संस्था, बाजारपेठ यांच्या मर्जीवर शेतकऱ्यांचे यश अवलंबून आहे. शेतकऱ्यांना पुढील भविष्याची कल्पना असेल तर तो पीकनियोजन करू शकतो. त्याचबरोबर शेती क्षेत्राच्या दृष्टीने वित्तपुरवठा व पूरक वितरण व्यवस्था महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या ७० टक्के जनतेने हलाखीत जगणे हे हितावह नाही असे ते म्हणाले. वीज व कर्जाबाबत वस्तुस्थिती समजावून सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या