पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजूबापू पाटील यांचे निधन, कोरोनामुळे पाटील कुटुंबातील 3ऱ्या व्यक्तीचा मृत्यू

1416

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते राजूबापू यशवंतराव पाटील (वय 56) यांचे गुरुवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 13 दिवसांत कोरोनामुळे पाटील यांच्या कुटुंबात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. पाटील यांच्या कुटुंबातील जवळपास 15 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

राजूबापू यांचे चुलते अनंतराव पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे 1 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर राजूबापू यांचा लहान भाऊ महेश पाटील यांच्यावर भोसे येथे उपचार सुरु होते. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुणे येथे घेऊन जात असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांचे वाटेत निधन झाले.त्यानंतर आज गुरुवार दि.13 ऑगस्ट रोजी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये राजूबापू यांचेही कोरोनामुळे निधन झाले. तेरा दिवसांत एकाच कुटुंबातील तीन जबाबदार व्यक्ती अचानक गेल्याने पंढरपूर तालुका हादरला आहे.

राजूबापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे साथीदार मानले जात होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती पदही भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीही दिली होती. शरद पवार यांच्या शिफारशीवरून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या  असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती. लोकांना सहज भेटणारे आणि या पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे म्हणून त्यांचा लौकीक होता.

आपली प्रतिक्रिया द्या