‘तिहेरी तलाक’वरुन मोदी सरकार-काँग्रेस आमनेसामने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभेत आवाजी मतदानाच्या जोरावर मंजूर झालेल्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर राज्यसभेत बुधवारी प्रचंड गोंधळ झाला. विधेयक संसदीय समितीकडे पाठवावे अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसच्या मागणीला मोदी सरकारने विरोध केला. यावरुन मोदी सरकार विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष असा गोंधळ सुरू झाला. अखेर राज्यसभेचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

सरकारने राज्यसभेत संध्याकाळी विधेयक सादर केले आणि चर्चेला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेसच्यावतीने खासदार आनंद शर्मा यांनी विधेयक संसदीय समितीकडे पाठवावे असा प्रस्ताव सादर केला. समितीच्या सदस्यांमध्ये कोणाचा समावेश असावा यासंदर्भातही त्यांनी प्रस्ताव दिला. समाजवादी पक्ष, डावे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले. विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव किमान २४ तास आधी सादर केला जातो, असे सांगत काँग्रेस परंपरा पाळत नसल्याचे जेटली म्हणाले. लोकसभेत समर्थन द्यायचे आणि राज्यसभेत विधेयक रोखायचे असे केल्यास विधेयक अडचणीत सापडेल. सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत तिहेरी तलाक प्रकरणी कायदा करण्याची मुदत दिली आहे. मात्र काँग्रेसच्या कृतीमुळे एक महत्त्वाचा निर्णय रखडला असल्याचे जेटली यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे तिढा निर्माण झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. अखेर राज्यसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या