बंधन पर्यावरण रक्षणाचे! बियांपासून बनवल्या इकोफ्रेंडली राख्या, ‘विशेष’ मुलांचा कौतुकास्पद उपक्रम

राखी पौर्णिमा आली की बाजारपेठा रंगीबेरंगी, आकर्षक राख्यांनी सजतात. आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी माझीच असावी, असे प्रत्येक बहिणाला वाटत असते. म्हणूनच वेगवेगळ्या संकल्पना वापरून राख्या तयार केल्या जातात. असाच एक आगळा प्रयोग केलाय दादरच्या आव्हान पालक संघाच्या विशेष मुलांनी. या मुलांनी पर्यावरण रक्षणाचे बंधन जोपासत बियांच्या अनोख्या राख्या बनवल्या आहेत. या राख्या कुंडीत टाकल्या की त्यापासून रोप तयार होतं. म्हणजे भावाबहिणीचं प्रेम रोपांच्या रुपाने वाढत जातं. ‘आव्हान’च्या मुलांच्या या स्तुत्य उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे.

मानसिक विकलांग मुलांसाठी दादर येथील आव्हान पालक संघ गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहे. ‘आव्हान’च्या विशेष मुलांसाठी तर प्रत्येक सण खास असतो. रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ‘आव्हान’च्या मुलांची विशेष लगबग सुरू आहे. या मुलांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तसं बघितलं तर ही मुले दरवर्षी राख्या तयार करतात. पण या वर्षी त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विविध बियांपासून राख्या तयार केल्या आहेत. ज्याप्रमाणे ट्री गणेश ही संकल्पना राबवली जाते, त्याच धर्तीवर यंदा राख्या तयार करण्याचा विचार मनात आला आणि आमच्या मुलांनी तो प्रत्यक्षात आणला, असे आव्हान पालक संघाच्या संचालिका वंदना कर्वे यांनी सांगितले. भावाबहिणीचे प्रेम झाडाच्या रुपाने अखंड राहावे. सोबत पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा उपक्रमामागील हेतू असल्याचे वंदना कर्वे यांनी सांगितले. वांगी, तेरडा, तुळस, धणे, शेवंती, झेंडू, लाल माठ, मुळा, भेंडी अशा विविध फळझाडं-फुलझाडांच्या बिया वापरून मुलांनी राख्या तयार केल्या आहेत.

rakhi-1

राख्या पोचल्या अमेरिकेत

आव्हान पालक संघाच्या मुलांनी बियांपासून तयार केलेल्या काही राख्या अमेरिकेला पाठवण्यात आल्या आहे. प्रत्येक राखीची किंमत 20 रुपये आहे. बियांसोबतच लोकरीची फुले, कापडी आणि कागदी फुलांचा वापर करून आकर्षक राख्या तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राख्या बनवण्याच्या कामात मुले दंग झाली आहेत. वेगळं काहीतरी साकारल्याचा आनंद त्यांच्या चेहऱयावरून ओसंडून वाहत आहे, असे वंदना कर्वे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या