प्रेमाचे अतूट नाते

338

डॉ. गणेश चंदनशिवे

दुस्थानी लोकरंगभूमीवर अनेक सण, उत्सव पाहावयास मिळतात. धर्म आणि धार्मिकता जपत असताना लोकसंस्कृतीला परंपरेनुसार अधिष्ठान प्राप्त झालेले दिसते. लोकपरंपरेत महाराष्ट्राच्या मराठी मातीत श्रावण महिन्याला अतिमहत्त्वाचे स्थान आहे. तसा श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केलेला आहे, पण या महिन्यात निसर्गाच्या सौंदर्याबरोबर काही सण, उत्सवसुद्धा मोठय़ा थाटामाटात साजरे केले जातात.

नागपंचमी, मंगळागौर, श्रावणी जत्रा, नारळी पौर्णिमा  इत्यादींचा समावेश आहे. हे सगळे उत्सव विधी, भक्ती आणि रंजन या त्रिसूत्रीच्या डोलाऱयावर उभे आहेत. ‘रक्षाबंधन’ त्यातलाच एक सण. सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी भाऊ-बहिणीचं पवित्र नातं रक्षाबंधनाच्या सणातून मराठी मुलुखात पाहावयास मिळते. रक्षाबंधन सणानिमित्ताने बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या मनगटावर पवित्र रेशीमधागा बांधून हा सण साजरा करते. बहिणीवर आलेले संकट निवारण्यासाठी भावाने सतत तिच्या अडीअडचणीच्या काळात खंबीरपणे उभे राहावे. त्या बहिणीला संकटातून मुक्त करावे अशी प्राचीन परंपरा मराठी मुलुखात रूढ आहे. रक्षाबंधन सणानिमित्ताने बहिणीच्या घरी भाऊ जाऊन तिच्या हातून राखी बांधून घेतो. या संकल्पनेतून धार्मिक पौराणिक धर्मग्रंथात बहीण भावाच्या या पवित्र नात्यावर अनेक उपदेशात्मक दृष्टांत पाहावयास मिळतात.

लोकनाटय़ांमधून बहीण भावाच्या नातेसंबंधावर अनेक लोकगीते, कवन, लोकनाटय़, आख्यान अनुभवास येतात. अनेक लोक आख्यानामध्ये रक्षाबंधन सणानिमित्ताने आख्याने आहेत. तमाशातील वगनाटय़ात बहीण-भावाचे नाते अर्थात पवित्र धागा. या लोकनाटय़ातून सासरी नांदायला गेलेल्या बहिणीवर सासरची मंडळी अन्याय, अत्याचार करतात. बहिणीवर घराण्याचे पवित्र संस्कार झालेले असल्यामुळे ती सासरचा छळ आपल्या माहेरी कोणालाच सांगत नाही. रक्षाबंधन सणानिमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जातो तेव्हा लक्ष्मीसारखी दिसणारी बहीण त्याला रूक्ष वाटते. आपल्या बहिणीवर झालेला अन्याय तिच्या वर्तनातून त्याला दिसतो. माझे दुःख मी भावालासुद्धा सांगू शकत नाही याची सल तिच्या मनात राहते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी बहीण भावाच्या गळय़ात पडून रडते तेव्हा भावाला तिच्या छळाचा उलगडा होतो.

भाऊ सासरच्या मंडळींना प्रेमाने सांगून पाहतो, पण ते त्याला बधत नाहीत. शेवटी बहिणीच्या प्रामाणिकतेची अनुभूती सासरच्यांना भाऊ पटवून देतो आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तिचा संसार पुन्हा गुण्यागोविंदाने उभा राहतो. ‘लोकसंस्कृती’ या वगनाटय़ातून भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम समाजाला घडते. अनेक चित्रपटांमध्ये रक्षाबंधनावर आधारित दृष्यं दाखविली जातात. बहीण-भावाच्या नात्यावर अनेक गाणी चित्रीत केली जातात. अशा प्रकारे लोकसंस्कृतीत बहीण-भावाचं अतूट प्रेम रक्षाबंधनामुळे पाहावयास मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या