रेशीमबंध तुझे.. माझे..

>> आसावरी जोशी 

रक्षाबंधन.. भाव बहिणीच्या निखळ, निस्सीम , निर्मळ, नात्याचे बंधन.. बंधन म्हणावे का या नात्याला..? बंधन तसा रुक्ष शब्द.. बंधनात राहणे नकोसे वाटते.. पण काही बंध मात्र अगदी तलम असतात.. सोनेरी रेशमागत.. लहानपणच्या फुलपंखी सोबतीगत.. बोटांना चिकटून बसणाऱ्या हव्याहव्याशा चंदेरी वर्खागत.. या बंधांची मखमली मिठी कधीच सोडविता येत नाही… उलट ती कधीच सुटू नये असेच वाटत राहते.. काही बंध अतूट असतात.. तसेच अदृश्यही..हे बंध केवळ रक्षाबंधनापुरते .. किंवा एखाद्या सोहळ्यापूरते मर्यादित कधीच नसतात.. ते वरवर दिसूनही येत नाहीत.. अनेकदा.. पण मनाच्या खोलवर गाभ्यात रुतलेले असतात .. हळुवारपणे.. म्हणूनच ते अदृश्य असतात.. साध्या नजरेस न दिसणारे.. तसे पाहता या नात्याला अमुक एक परिमाण लावताच येत नाही.. जबरदस्ती तर अजिबातच नाही.. पण आत्यंतिक प्रेमाची बळजोरी.. दादागिरी.. ताईगिरी मात्र दिलखुलास चालते. किंबहुना ती हवीहवीशीच असते. या लहानपणीच्या जुळलेल्या तारा नेहमीच आनंदसूर आळवत असतात.. आपल्या तालात फक्त ते ऐकू येण्याचा कान मात्र हवा.. दोन्हीकडून.

रक्षाबंधनाची एक सरधोपट व्याख्या केली जाते. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून बहिण भावाला राखी बांधते. हे बंध फक्त रक्षणापुरते किंवा पारंपारिक नाते निभावण्यापुरतेच मर्यादित असतात का..? मला वाटते राखीचे विविध रंग या सुंदर नात्याचे प्रतिक असतात. त्यात भांडण असते.. रुसवा असतो.. मस्करी असते.. थट्टा असते.. प्रेम तर असतेच आणि या साऱ्यासोबत असतो एकमेकांवरचा विश्वास.. परस्परांसाठी असण्याचा.. हा विश्वास म्हणजे राखीचा नाजूक बंध.

आपण बहिणी आपल्या भावावर इतके प्रेम करीत असतो की प्रत्येक कृतीतून त्याचे केवळ आणि केवळ इष्टच चिंतत असतो. पाहूया आपल्या भावाला त्याच्या राशीनुसार कोणत्या रंगाची राखी बांधावी आणि त्याला कोणते पक्वान्न भरवावे..

 • मेष – लाल रंगाची राखी आणि मालपुवा
 • वृषभ – पांढऱ्या धाग्याची राखी आणि खीर
 • मिथुन – हिरव्या रंगाची राखी , मैसूर पाक
 • कर्क – पिवळा रेशीम दोरा, रबडी.
 • सिंह – पंचरंगी धागा, रसमलाई.
 • कन्या – गणेश चिन्ह असलेली राखी, मोतीचूर लाडू
 • तुला – पिवळ्या रंगाची राखी, शेवयांची खीर
 • वृश्चिक – गुलाबी धाग्याची राखी, पुरणपोळी.
 • धनु – पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची राखी, रसगुल्ला
 • मकर – मिश्र रंगाचा धागा, पाकातल्या पुऱ्या
 • कुंभ – निळ्या रंगाची राखी, पिस्ता बर्फी.
 • मीन – जरीची राखी, बासुंदी.