रक्षाबंधन विशेष! मुकुल माधव फाउंडेशनने सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या 2600 राख्या

रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला अधिक घट्ट करणारा सण आहे. याच नात्याची वीण घट्ट करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने 2600 राख्या सीमेवरील जवान, पोलीस कर्मचारी आणि विशेष मुलांसाठी पाठवण्यात आल्या. या राख्या फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात आल्या.

रत्नागिरी (महाराष्ट्र) आणि मासार (गुजरात) येथील फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीतील मुकुल माधव विद्यालय, विशेष मुलांचे कौशल्य विकास केंद्र, येरवडा येथील मनोरुग्णालयातील रुग्णांनी आणि थॅलेसेमियाग्रस्त तरुणांनी राख्या बनवण्याच्या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रेम, काळजी आणि चांगल्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना करत या राख्या आपल्या सीमेवरील भावांना पाठवण्यात आल्या.

या राख्या रत्नागिरी येथील तटरक्षक दल, पोलीस कर्मचारी, सियाचिनमधील जवान, औंध लष्कर केंद्रातील जवान, अपंग सैनिक कल्याण केंद्रातील जवान, रत्नागिरीतील रिमांड होम, उत्तर आणि पश्चिम भारताच्या सीमेवरील जवान, राजस्थानच्या सीमेवरील जवानाना पाठवल्या आहेत. तसेच गुजरातच्या पद्रा गावातील शाळा आणि मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी येथील विद्यार्थी राख्यांची देवाणघेवाण करणार आहेत.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या की,सीमेवर आपल्या संरक्षणासाठी तैनात भावांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी दरवर्षी फाउंडेशनकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठवल्या जातात. प्रेम, काळजी आणि प्रार्थनेसह ही राखी पाठवली आहे. औंध लष्कर केंद्रात सेलेब्रल पाल्सीग्रस्त, गतिमंद, थॅलेसेमिया ग्रस्त, अनाथ मुली आणि मुकुल माधव फाउंडेशनमधील महिला कर्मचारी राखी बांधून रक्षा बंधन साजरा करणार आहेत.