बंध रेशमाचे !

राखी पौर्णिमा हा सण भाऊ-बहिणीमधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नवीन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री काडगावकर यांनी आपल्या भावाबरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

 धनश्री काडगावकर

आम्ही लहानपणी खूप भांडायचो, पण ते तेवढय़ापुरतेच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेटवस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे, पण आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करू.

दीपा परब-चौधरी

आमचे नाते खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो. या वर्षीदेखील तेवढय़ाच आनंदाने आणि उत्साहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत.’

पल्लवी पाटील

माझाच भाऊ नाही तर चुलत भावांनादेखील राखी बांधते. आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणावे असे वाटायचे. ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणून पूर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. आम्हा भावंडांचे नाते खूप गोड आहे.