इव्हीएम विरोधात नागपुरात सर्वपक्षीय उमेदवार रस्त्यावर उतरले

18

सामना ऑनलाईन । नागपूर

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सर्व दलीय प्रजातंत्र बचाओ समितीने केला आहे़. नागपूर महापालिकेची नुकतीच पार पडलेली निवडणूक रद्द करून मतपत्रिकेद्वारे (बॅलेट) फेरनिवडणूक घेण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़

महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घोटाळा केला, असा आरोप विविध पक्षाचे नेते आणि पराभूत उमेदवारांनी केला आहे़. इव्हीएम विरोधात लढा उभारण्यासाठी सर्वदलीय प्रजातंत्र बचाओ समिती नागपूरात स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे गुरुवारी (२ मार्च) सकाळी ११.३० वाजता चिटणवीस पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. या  मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार, शेख हुसेन, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर, किशोर पराते, चिंटू महाराज, अतुल सेनाड, कांता पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, इश्वर बाळबुधे, माजी महापौर किशोर डोरले यांनी केले़.

भाजप सरकारविरूद्ध घोषणाबाजी करीत मोर्चाला सुरूवात झाली़. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी फेरमतदार घेण्यात यावे, अशी मागणी केली़. या मोर्चात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते़. सरकारविरोधात घोषणा देत हा मोर्चा गोवारी टी पॉईन्टजवळ आल्यानंतर संविधान चौकात अडविण्यात आला़. आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रचंड नारेबाजी करीत निदर्शने केली़.

महापालिकेच्या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि घोटाळा झाला़ याचा फटका आम्हाला बसला आहे, असा पराभूत उमदेवारांचा आरोप आहे़ या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला आहे़ पहिल्या टप्प्यात आंदोलन करून व मोर्चा काढून मागणी रेटून धरण्यात आली़ आता फेरमदान घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या जाणार आहे़त.

या आहेत मागण्या

महापालिका निवडणूक रद्द करावी़ फेरमतदान घ्यावे़. इव्हीएम मशीनची सीबीआयमार्फत चौकशी करावी़. इव्हीएम रद्द करून बॅलेट पेपरव्दारे निवडणुका घ्याव्यात. प्रभाग पद्धती रद्द करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़. प्रभाग पद्धतीमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले़. अनेक मतदारांपर्यंत मतदान बुथ क्रमांक आणि बुथचे नाव असणाऱ्या पावत्या पोहोचल्या नाहीत. इव्हीएम मशीन संदर्भात कोणत्याही प्रकारचे नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आलेले नाही़. यासह निवडणूक प्रक्रियेतील अनेक दोष यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले़.

आपली प्रतिक्रिया द्या