महाराष्ट्र माझा निजला!

919

संजय राऊत

rautsanjay61@gmail.com

प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी यांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटवण्यात आला. दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत तेच घडले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे हे एका जातीचे नव्हते. शौर्य एका जातीची मक्तेदारी नव्हती. जनरल अरुणकुमार वैद्य, चिंतामणराव देशमुख यांची जात कुणी विचारेल काय? पण शिवाजी महाराजांनी २०० लढाया ज्या स्वकीयांविरुद्ध लढल्या ते कोण होते? संभाजीराजे मोगलांच्या तावडीत असताना घाईघाईत राज्याभिषेक उरकून घेणारे कोण होते? या सगळय़ांनीच छत्रपतींचा अपमान केलाय. त्यांच्यावर नवे ‘राजसंन्यास’ लिहायचे काय?

‘‘कीर्ती आणि निंदा यांचा गडकऱयांना एकाच वेळी लाभ होत गेला, पण गडकऱयांचे कर्तृत्व ज्यावेळी लोकांना कळून आले त्यावेळी त्यांचे शरीर काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावलेले होते.’’’ – आचार्य प्र. के. अत्रे

गडकऱयांच्या बाबतीत हे विधान आजही तंतोतंत लागू पडते. राम गणेश गडकरी यांच्या पुण्यातील पुतळय़ास पन्नास वर्षे होऊन गेली (१९६२), त्यावेळी पुण्याच्या संभाजी बागेत आचार्य अत्रे यांच्या हस्ते गडकरी यांच्या पुतळय़ाचे अनावरण झाले. हा अर्धपुतळा त्यांच्या निंदकांनी रात्रीच्या अंधारात हटवला, पण त्यामुळे शंभर वर्षांनंतर गडकरी पुन्हा चर्चेत आले व लोकप्रिय ठरले.

हे सर्व लोक स्वतःला शिवाजीराजांचे भक्त व संभाजीराजांचे मावळे मानतात, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील जातीय ऊरबडव्यांनी जो उच्छाद मांडला आहे त्याचे शेवटचे टोक म्हणजे पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा अंधारात हटविला हे होय. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा मध्यरात्री हटवला. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य होते व या झुंडशाहीचा निषेध करण्यात जे ‘बुद्धिमंत’ आघाडीवर होते तेच पांढरपेशे आज महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. म्हणजे सत्ताधारी बदलले तरी शिवरायांच्या नावाने सुरू असलेली जातीय झुंडशाही कायम आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला व सहिष्णुतेला कलंक लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. समर्थ रामदास व शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसही या लोकांनी सोडले नाही. राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा ज्यांनी पाडला त्यांनी हे कृत्य रात्रीच्या अंधारात केले. ‘राजसंन्यास’ नाटक गेल्या शंभरेक वर्षांपासून मराठी साहित्यात अर्धवट अवस्थेत आहे. संभाजीराजे यांच्याविषयी काही आक्षेपार्ह प्रसंग व स्वगते ‘राजसंन्यास’मध्ये आहेत हे कळायला शंभर वर्षे लागली, हे वैचारिक दुर्बलतेचे लक्षण मानले पाहिजे. राम गणेश गडकरी हे शब्दप्रभू, प्रतिभेचे सम्राट होते. ते कुणी राजकारणी किंवा टाटा, बिर्ला, अंबानी नव्हते. ते गरीब बिच्चारे लेखक होते. महाराष्ट्राच्या पिढय़ान्पिढय़ा त्यांच्या नाटकांनी पोसल्या. मराठी काव्य, नाटय़, भाषा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या पुतळय़ावर काल ज्यांनी घणाचे घाव घातले त्यांनी यापुढे महाराष्ट्राचे नाव घेऊ नये.

गाव तेथे गडकरी

राम गणेश गडकरी यांच्या नावाचा रस्ता नाही, त्यांच्या नावाचा चौक नाही व त्यांच्या नावाचे रंगमंदिर नाही असा एकही जिल्हा किंवा शहर महाराष्ट्रात नसेल. गेली ८५ वर्षे महाराष्ट्र गडकऱयांची पूजा करतोय. मराठी भाषेत, साहित्यात राम गणेश गडकरी यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी या शतकातील फारच थोडय़ा मराठी लेखकांच्या वाटय़ास आली असेल.

आचार्य अत्रे हे गडकऱयांच्या सहवासात आले व भक्त झाले. संभाजी उद्यानातील जो पुतळा विकृतांनी पाडला त्या पुतळय़ाचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी १९६२ साली केले. अत्रे गडकरींविषयी लिहितात-

‘‘जो कवी असतो, तो कदाचित नाटककारही असू शकेल, पण तो विनोदकार असू शकणार नाही आणि जो विनोदाचा निर्माता असतो, तो नाटककार होऊ शकेल, पण उत्तम कवी असू शकणार नाही. मोलिअर नि शेक्सपीअर हे दोघेही महान नाटककार होऊन गेले. मोलिअरने हास्य निर्माण केले आणि शेक्सपीअरने काव्य निर्माण केले, पण मोलिअर हा कवी नव्हता नि शेक्सपीअर हा हास्यकार नव्हता. पण गडकऱयांनी मोलिअर आणि शेक्सपीअरवरसुद्धा मात केली. काव्य, नाटय़ आणि विनोद या परस्परविरोधी तिन्ही क्षेत्रांत ते सारख्याच वैभवाने आणि दिमाखाने तळपले. त्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात जरी ते वावरले असते तरी त्यांनी तेवढेच यश मिळविले असते, पण साहित्यामधल्या अत्यंत बिकट म्हणून समजल्या जाणाऱया या तिन्ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळविले आणि अलौकिक यश संपादन केले! म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाभोवती नि व्यक्तिमत्त्वाभोवती अद्भुततेचे रोमहर्षक वलय निर्माण झाले आणि त्यांच्या ओठातून आणि बोटातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरा-अक्षराने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले.

अन् एवढा सारा दिग्विजय अवघ्या चौतीस वर्षांच्या वयात मिळवून ते निघून गेले. त्यांच्या अमर लेखनाचा नि कर्तृत्वाचा काळ अवघा सहा-सात वर्षांचा होता. 1911 पासून तो 1918 पर्यंत! एवढय़ा थोडय़ा काळात त्यांनी मराठी साहित्यात आपले जे क्रांतिकारक युग निर्माण केले ते अद्यापि चालूच आहे. त्यांची सद्दी अजून संपली नाही.’’ गडकरींना जाऊन शतक होत आले तरी त्यांची कीर्ती पहिल्याइतकीच प्रफुल्लित आणि टवटवीत आहे. किंबहुना त्यांच्या अवसानानंतर जशी जशी अधिकाधिक वर्षे लोटताहेत, तसा तसा त्यांचा लौकिक नि आकर्षण जास्त जास्तच वाढत चालले आहे.’’

प्रखर शिवभक्त

गडकरी त्यांच्या शब्दप्रभुत्वाने चिरंजीव होतेच, पण पुण्यातील त्यांचा पुतळा तोडल्यावर ते अजरामर झाले आहेत. ज्या ‘राजसंन्यास’वरून पुण्यात त्यांच्या पुतळय़ावर हल्ले झाले ते ‘नाटक’ त्यांनी कुणाला अर्पण करावे? तर छत्रपती शिवाजीराजांच्या चितेत आत्मार्पण करणाऱया त्यांच्या आवडत्या इमानी कुत्र्याला. ही हृदयस्पर्शी कल्पना फक्त गडकऱयांनाच सुचू शकते. गडकरी हे शिवाजी महाराजांवर ऊठसूट प्रवचने देत नव्हते, पण त्यांच्या शिवभक्तीची तऱहाच वेगळी होती.

शिवछत्रपतींच्या चरित्राबद्दल आणि इतिहासाबद्दल त्यांना पराकाष्ठsचे प्रेम नि कमालीचा जिव्हाळा वाटत होता. रायगड पाहावयाला जाण्याचा एकदा काही मित्रांनी त्यांना आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, ‘‘रायगडच्या पहिल्या पायरीवर पाय टाकताच मी बेशुद्ध होऊन पडेन!’’ त्या त्यांच्या उद्गारातली ज्वलंत भावना कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. पुण्यापासून सिंहगड इतका जवळ असताना तो पाहण्यासाठी ते एकदाही गेले नाहीत. का? तर ते म्हणत, ‘‘सिंहगडाच्या पठारावर एकदा का मी उभा राहिलो तर ‘इंडियन पिनल कोड’ची 124 (अ) नि (ब) ही कलमे मला खाली ओढून आणायला असमर्थ ठरतील!’’ हे सर्व त्यांचे परमभक्त अत्र्यांच्या लेखनात आले आहे.

विनोदी आणि गमतीदार

गडकरी हे गमतीदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावावर जितके विनोद खपवले तेवढे पुलंच्या नावावरही खपवले नसतील. ते स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मास आले व त्याच काळात मरण पावले. त्यामुळे आज किरकोळ लोकांना सरकारी इतमाम वगैरे मिळतो तसा त्यांना मिळाला नाही. किर्लोस्कर नाटक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज किंवा रँग्लर परांजपे यांच्याविषयी गडकऱयांची भक्ती अगदी पराकोटीची होती. त्यामुळे या संस्थांवर टीका केली की गडकरी त्यांच्यावर तुटून पडत. रँग्लर परांजपे हे त्यांच्या मिश्यांचे आकडे वळवितात म्हणून त्यांच्यावर कोणीतरी टीका करताच, ‘‘रँग्लरांच्या मिश्या टोचल्याची तुमच्या घरातून तक्रार आली आहे काय?’’ असा सरळ प्रश्न विचारून गडकऱयांनी त्या टीकाकारास आडवे केले. गडकरी आजाराला भीत व डॉक्टरांचे अजिबात ऐकत नसत. डॉक्टरांनी त्यांना दात काढून कवळी बसवायला सांगितली, पण गडकरी मुळीच ऐकेनात. दातांचा आणि बुद्धीचा निकट संबंध आहे असे त्यांनी कुठेतरी वाचले होते. ते म्हणाले, ‘‘मी बुद्धिजीवी माणूस आहे. दात काढून माझ्या बुद्धीला अपाय झाला तर मी जगणार कसा?’’

सहज विनोद!

गडकऱयांच्या विनोदाची मौज ही होती की, तो अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त असे. त्यांच्या प्रतिभेचा झपाटाच वेगळा. त्यांच्या विनोदी वचनांची आणि सुभाषितांची कित्येक उदाहरणे देता येतील.

जगण्यासारखे जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे.

मरणाने माणसाला मोल येते.

लाखात एखादा हात खरा असतो.

पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे.

रामाशी मन रमल्यावर माकडाशी मिठय़ा मारण्यात काय अर्थ आहे?

पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे, तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे.

पाय मोडल्यावर मैना कसली!

गळा दाबल्यावर कोयल कसली!

दात पाडल्यावर नागीण नाही!

डोळे फोडल्यावर वाघीण नाही.

पतिक्रतांची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोचविते आणि नरपशूला नारायणस्वरूप बनविते. पतिक्रतेच्या पुण्याईपुढे पाप पांगळे पडून तिच्या पायाशी लोळण घेते!

‘‘जा, बाप, भाऊ, माझे जगात कोणी नाही. पतिक्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते. देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवऱयाची ती बायको असते!

‘एकच प्याल्या’तील मद्याच्या दुष्परिणामांवरील त्यांचे हे ज्वलंत संवाद वाचा. नशाबंदीवर सरकार कोटय़वधी रुपये ‘रिकाम्या’ ग्लासात वाया घालवते. त्याऐवजी गडकऱयांचे हे ज्वलंत ‘संवाद’ प्रसिद्ध केले तरी लोक नशामुक्त होतील. गडकरी लिहितात,

‘‘आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काबाडकष्ट उपसून आलेला थकवा घालविण्यासाठी दारू पिणाऱया मजुरांच्या या पहा झोपडय़ा! निरुद्योगाची वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणाऱया श्रीमंतांच्या या पहा हवेल्या! प्रतिष्ठतपणाचे लक्षण म्हणून चोचल्याने दारू प्यायला शिकलेल्या पढतमूर्खांचा हा पहा तांडा! उद्योगी-गरीब, आळशी-श्रीमंत, साक्षर-पढतमूर्ख, निरक्षर-व्यवहारी या सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा एकच प्याला! दारूबाज नवऱयाच्या बायकांची ही पहा पांढरी फटफटीत कपाळे, दारूबाजाच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या ऐका या किंकाळय़ा! स्त्री जातीला नटवण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितके मोती बाहेर निघाले, त्याच्या दसपट आसवांचे मोती दारूमुळे स्त्री जातीने या एकाच प्याल्यात टाकले आहेत. जगावर अंमल चालविणारा सिकंदर दारूच्या अमलाखाली मारेकरी बनून तो पहा आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे! मेलेल्यांना सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य, तो पहा आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात स्वतःच मरून पडलेला आहे! जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे हे पहा छप्पन्न कोटी यादव वीर दारूच्या एकच प्याल्यात बुडून अधःपात भोगीत आहेत!’’

काही धाडसी प्रश्न

‘गोविंदाग्रज’ या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. ते खऱया अर्थाने ‘महाराष्ट्र शाहीर’ होते.

महाराष्ट्र गीत

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडय़ाच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।१।।

असे महाराष्ट्र देशाचे स्तवन त्यांनी गायले. गडकऱयांविषयी असे सांगतात की, त्यांनी ज्याला आपला म्हटले त्याच्यासाठी ते जिवाचे रान करावयाला तयार असत. चिंतामणराव कोल्हटकर यांच्याविरुद्ध एकाने त्यांना काही सांगितले, त्याबरोबर ‘‘मी चिंतामणरावांबरोबर नरकात जाईन, पण तुमच्याबरोबर स्वर्गात येणार नाही!’’ असे खाड्कन गडकऱयांनी त्यांना बजावून सांगितले. ज्या काळात केवळ लेखनावर उपजीविका करणे अशक्य होते, त्या काळात केवळ लेखनासाठी आणि लेखनावर जगण्याचा प्रयत्न गडकऱयांनी केला. दारिद्रय़ाशी आणि लोकनिंदेशी त्यांना मरेपर्यंत झगडावे लागले. छगन भुजबळांसारख्या नेत्याच्या सुटकेसाठी समाज रस्त्यावर येतो, पण छत्रपती शिवाजीराजांची तलवार तोडल्यावरही जो समाज डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून बसतो तोच समाज राम गणेश गडकरींचा पुतळा तोडल्यावरही षंढासारखा गप्प बसतो. शिवाजी महाराजांपासून राम गणेशांपर्यंत सगळय़ांना जातीची लेबले लावून आपण जणू राजकीय बाजार भरवला आहे. ज्यांनी पुतळय़ांवर हातोडे मारले त्यांच्यासाठी सोशल मीडियावर विचारलेले दोन प्रश्न देतो व विषय संपवतो.

हरी नरके धाडसाने विचारतात, ‘‘छत्रपती संभाजीराजांना पकडून देणारे, त्यांची साथ सोडून पळून जाणारे आणि शंभूराजे शत्रूच्या कैदेत असताना त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अवघ्या आठवडाभरात स्वतःला राज्याभिषेक करणारे नेमके कोण होते? हे ऐतिहासिक ‘सातबारे’ कोणाकडे मागायचे?’’

‘झी’ मराठीचे ‘बिझनेस हेड’ दीपक राजाध्यक्ष यांनी जोरकसपणे विचारले आहे, ‘‘हत्या करून, पुतळे फोडून, संशोधन संस्थांची राखरांगोळी करून अद्यापि पुरेसे समाधान झालेले नसताना कशाला हवेत नवे पुतळे…
नवी स्मारके…

नव्या संशोधन संस्था…

शिल्लक असलेलं सगळं आधी नष्ट होऊन जाऊ दे. मग नव्याने सगळे पुन्हा उभारता येईलच. निर्मितीपेक्षा नष्ट करण्याची झिंग वाढत चालली आहे काय?’’

गडकरी यांची जात शोधून हल्लेखोरांनी त्यांचा पुतळा फोडला. महाराष्ट्राच्या इभ्रतीला व पुरोगामित्वाला लावलेली ही चूड आहे. जातीय तळीरामांनी मराठी संस्कृतीवर टाकलेल्या या दारूच्या गुळण्या आहेत. असे जातीय द्वेषाचे व विध्वंसाचे काही घडले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पवार-पाटील, भोसल्यांवर टीकेची झोड उडविणाऱयांचे आज महाराष्ट्रात राज्य आहे. सर्व जातीधर्माच्या मराठी माणसांनी निषेध करावा असा हा प्रकार आहे. जोपर्यंत अशा विकृत विचारसरणीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात एकही साहित्य संमेलन, नाटय़संमेलन आयोजित करण्यात येणार नाही अशी भूमिका घेऊन उभे राहायलाच हवे. कर्नाटकातील लेखक एम. एम. कलबुर्गी व महाराष्ट्रातील गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जे लेखक व चळवळे रस्त्यावर उतरले ते सर्वजण राम गणेश गडकरी यांच्या पुतळय़ावरील हल्ल्यानंतर गप्प बसून आहेत.

‘राजहंस माझा निजला’ हे शोकगीत राम गणेशांनी म्हणजे गोविंदाग्रजांनी लिहिले होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही शोकगीतच झाले आहे.

‘‘महाराष्ट्र माझा निजला!’’ त्याला कुणी जागे करील काय?

आपली प्रतिक्रिया द्या