अयोध्यावासीयांना राम पावला, श्रीराम मंदिराचा पायाभरणी सोहळा झाल्यावर जमिनीच्या किमती तिप्पट

पवित्र अयोध्यानगरीत भगवान श्रीराम मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला आणि अयोध्येतील जमिनींचे भाव लगेचच तिपटीने वाढले. राम मंदिर पूर्ण होण्याच्या आधीच श्रीराम अयोध्यावासीयांना पावल्याचे या भाववाढीमुळे बोलले जात आहे. जमिनींचे दर तिप्पट झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना लवकरच सोनियाचे दिवस येणार असे भाकीत आता व्यक्त केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीवर रामलल्लाचे मंदिर उभारण्यास मंजुरी दिली आणि लगोलग अयोध्या शहर व अयोध्यानगरीच्या आसपास असणाऱया भागात जमिनींचे भाव तिप्पट झाले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारल्यावर अयोध्येला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचे स्वरूप येणार हे लक्षात आल्यावर अयोध्येतील जमीन आणि घरांच्या किमतींनी मोठी भरारी घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकही या प्रभुप्रसादामुळे प्रचंड खुशीत आहेत.

राम नगरीत जमिनीच्या दराची मोठी उड्डाणे

अयोध्या नगरीत जमीन मर्यादित असल्यामुळे येथील जमिनीच्या दराने 2 ते 3 हजार रुपये प्रति चौरस फूट असा पल्ला गाठला आहे. यापूर्वी येथील जमीन 1 हजार रुपये प्रति चौरस फूट दराने सहज मिळत होती. पण मंदिराचा पाय भरणी सोहोळा झाला आणि अयोध्येतील जमिनीच्या किमतीचे दर तिपटीने वाढले. अयोध्या नगरीच्या बाहेरील जमिनीही आता महाग झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या