अयोध्येत राम मंदिरच होणार!

31

सामना प्रतिनिधी । नागपूर

अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत सर्वसहमती बनणे शक्य नसल्याचे सांगत त्या जागेवर राम मंदिरच होईल, तेथे दुसरे कोणतेही बांधकाम होणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज ठणकावले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू आहे. या सभेत शनिवारी भय्याजी जोशी यांची सलग चौथ्यांदा संघाच्या सरकार्यवाहपदी निवड करण्यात आली. राज्यातील शेतकऱयांचा प्रश्न अतिशय गंभीर असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज जोशी यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनीही आपली मानसिकता बदलावी, असे मतही जोशी यांनी व्यक्त केले.

आता सहा सह सरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपुरात पार पडली. या प्रतिनिधी सभेत पुढील तीन वर्षांकरिता सरकार्यवाह या पदावर सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांची निवड करण्यात आली, तर रविवारी नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संघात आता सहा सह सरकार्यवाह राहणार असून आजवर प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया डॉ. मनमोहन वैद्य यांनाही त्यात स्थान देण्यात आले आहे. संघाचे माजी प्रवत्ते मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत.

९ ते ११ मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुढील तीन वर्षांसाठीची कार्यकारिणीही प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी गठित करण्यात आली. त्यात सरसंघचालक – डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी तर सह सरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, व्ही भागय्या, मनमोहन वैद्य, मुकुंद सीआर हे असतील.

आपली प्रतिक्रिया द्या