पत्रकार हत्या प्रकरणात रामरहीम दोषी, 17 जानेवारीला शिक्षा सुनावणार

12

सामना ऑनलाईन । पंचकुला

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांना तब्बल 16 वर्षांनंतर न्याय मिळाला. छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख रामरहीम याच्यासह चारजणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या चौघांना 17 जानेवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाने दोषी ठरवताच तीन आरोपींची अंबाला कारागृहात रवानगी करण्यात आली. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुला न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामहीम याचा पर्दाफाश करण्याचे काम पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी केले होते. 24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. गोळय़ा घालणारे कुलदीप व निर्मल या दोघांना लोकांनी घटनास्थळावरच पकडले होते. नंतर किशनलाल यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणात बाबा रामरहीम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

31 जुलै 2007 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर 12 डिसेंबर 2008 रोजी आरोप निश्चित करण्यात आले. बचाव पक्षाच्या वतीने 21 साक्षीदार सादर करण्यात आले, तर सरकार पक्षाने 46 साक्षीदार सादर केले. 2 जानेवारी 2019 रोजी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. आज न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले.

– रामचंद्र छत्रपती यांचा मुलगा अंशुल याने 16 वर्षे ही न्यायालयीन लढाई लढवली. पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयात हा खटला चालला.

आपली प्रतिक्रिया द्या