नगर – पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांपेक्षा पूर्वनियोजित कार्यक्रम महत्त्वाचे

18

सामना प्रतिनिधी । नगर

शेवगाव येथील ऊसदर आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते. मात्र, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना या शेतकऱयांची भेट घेण्यासाठी तब्बल सात दिवसांनंतर वेळ मिळाला आहे. महिनाभर आधी आपण बाहेर जिह्यातील कार्यक्रम घेतल्यामुळे जखमी शेतकऱयांना भेटण्यासाठी त्वरित येता आले नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, जखमी शेतकरी संभाजीनगर जिल्ह्यातील असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मदत दिली जाईल, तसेच दोषींवर कारवाई होईल, असे ठेवणीतील उत्तर द्यायलाही ते विसरले नाहीत.

शेवगाव येथील ऊसदर आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते. त्यांच्यावर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तब्बल सातव्या दिवसांनंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी विश्वजित माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, साखर सहसंचालक संगीता डोंगरे, जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे, तहसीलदार सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे भाव दिला पाहिजे. सहकारी, खासगी कारखान्यांनी समन्वयातून मार्ग काढण्याची गरज होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे होते. एकाकी भूमिका घेणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने व ऊसउत्पादकांची बैठक नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ऊसदराबाबत चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या