रामायणावरून सोनाक्षी सिन्हा-मुकेश खन्ना यांच्यात ‘महाभारत’, मुलीच्या बचावासाठी ‘शॉटगन’ मैदानात

5216

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मागणीमुळे डीडी नॅशनलवर ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. याच दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रामायणाबाबत दाखवलेल्या सामान्य ज्ञानावरून सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात आहे. ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील आपल्या खास अंदाजात सोनाक्षीचा समाचार घेतला. त्यामुळे नेटकरी तिला जास्तच ट्रोल करत आहे. यावर सोनाक्षी सिन्हा हिने काही प्रतिक्रिया दिली नसली तरी तिचे वडील ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा तिच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला. मला असे वाटते की रामायणाच्या प्रश्नावर उत्तर देता आले नाही म्हणून काही लोक तिच्यावर दात ओठ खात आहेत. परंतु ते स्वतः रामायणाचे तज्ज्ञ आहे का? त्यांना हिंदू रक्षक कोणी बनवले? असा सवालही शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी हिचे कौतुकही केले आहे. ती स्वतःच्या जीवावर स्टार झाली असून मला तिच्यावर गर्व असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटले.

मुकेश खन्ना यांनी साधला होता निशाणा
‘केबीसी’मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला सोनाक्षी उत्तर देऊ शकली नाही. रामायणात हनुमानाने संजीवनी कोणासाठी आणली? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता, मात्र ती उत्तर देऊ शकली नाही. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मुकेश खन्ना यांनीही तिच्यावर निशाणा साधताना तिला रामायण आणि महाभारत या मालिका पाहायला हव्यात असा सल्ला दिला होता. पौराणिक कथांबाबत तिला काहीच ज्ञान नसल्याची टीकाही त्यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या