।। स्वयें श्रीरामप्रभू ऐकती ।।

11 जानेवारी रोजी  रवींद्र नाट्य मंदिर येथे रात्री 8.45 वाजता ‘रामचरित्राचे महानाट्य’ 150 कलाकारांच्या संचासह रसिकांना पाहता येणार आहे.

ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकरांचे शब्द आणि ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांनी साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती… आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कलाकृती तरुण कलाकार नव्याने साकारत आहेत. रामायणाचा भव्य देखावा… कलाकारांनी संगीत, वादन, नृत्य या कलांच्या मिलाफाने उलगडलेली गीतरामायणाची कथा महानाट्याच्या रूपात पाहण्याची अविस्मरणीय संधी लाभणार आहे. 11 जानेवारी रोजी  रवींद्र नाट्य मंदिर येथे रात्री 8.45 वाजता ‘रामचरित्राचे महानाट्य’ 150 कलाकारांच्या संचासह रसिकांना पाहता येणार आहे. रघुलीला एण्टरप्रायझेस आणि अभिव्यक्ती निर्मित हा कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेगळेपणाविषयी संगीतकार आदित्य बिवलकर सांगतात, गीतरामायण एवढय़ा मोठय़ा स्वरूपात काही वर्षांपूर्वी सादर झालं होतं, मात्र त्यामध्ये लाईव्ह संगीत नव्हतं. तसेच आजपर्यंत यावर महानाट्याची संकल्पनाही साकारली गेलेली नाही. त्यामुळे या विषयावर वेगळं काहीतरी करूया या विचाराने ही संकल्पना सुचली आणि त्यानुसार  रामचरित्राचे महानाट्य सादर होत आहे. यासोबतच नृत्यांगनांच्या कलाविष्काराबरोबर गायकांना वादकांची सुरेल साथ लाभलीय. गीतरामायणातली गाणी वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतात असे वाटले. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमातून जिवंत महानाट्य पाहता येईल हे निश्चित.

संहितेचं लेखन, 150 कलाकारांना एकत्र आणणं, त्यांचं दिग्दर्शन करणं, संहिता अभ्यासकांकडून तपासून घेणं, मोठय़ा संचाकडून तालीम करून घेणं  या सर्व  अडचणींचा सामना करतच या कार्यक्रमात यश मिळाले, अशी माहिती ते देतात.

महानाट्याचे वेगळेपण

दशरथाचा यज्ञ, रामजन्म, सीता स्वयंवर, चौदा वर्षांचा वनवास, रावणाचे कपट या आणि अशा अनेक कथा बालपणापासून ऐकल्या जातात. रामायणातला हा काळ अभिनयातून साकारला जाण्याचा प्रयत्न गीतरामायण या नाट्याच्या रूपाने करण्यात आला. रामजन्मापासून सुरू होणारी समग्र रामायणाची ही कथा नाट्यरूपात मांडली जाणार आहे. याला कथक नृत्यासह गायन तसेच वादनाचीही साथ दिली आहे. नेपथ्य, संगीत अशा सर्वच माध्यमांतून रामायणाचा काळ अनुभविण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.