”…तर लोकसभा निवडणुकीत भाजपला ५० जागा मिळतील”

सामना ऑनलाईन । लखनौ

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थानप करण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशात महाआघाडीची स्थापना झाली तर भाजपची डोकेदुखी नक्कीच वाढेल, असं आठवले यांनी सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लखनौ येथे बोलताना आठवले म्हणाले की, जर महाआघाडीची स्थापना झाली तर उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. जर विरोधकांची एकजूट झाली तर उत्तर प्रदेशात भाजपला केवळ ५० जागा जिंकता येतील. सध्या उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा भाजपकडे आहेत.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, ‘राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे सोपे नसते. निवडणुकीपर्यंत ठीक आहे, मात्र पुढील तडजोडी आणि इतर गोष्टी सोप्या नसतात. त्यामुळे महाआघाडी झाली तर उत्तर प्रदेशात त्यांना ३०-३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्यांनाच फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही लोकांना आम्ही केलेल्या कामाची माहिती देऊ.’

उत्तर प्रदेशात आरपीआय आपला विस्तार करत आहे आणि त्याचा फायदा भाजपला नक्की होईल, असंही आठवले यांनी सांगितलं. मायावती यांनी समाजवादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाराज झालेल्या दलित नागरिकांचा संख्या मोठी आहे. भाजपने उत्तर प्रदेशात आरपीआय २-३ जागी उमेदवारी दिली तर त्याचा भाजपला फायदा होईल, असंही आठवले म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या