मेरे भाषण पर मत लगाओ बॅन, रामदास आठवलेंची कवितेतून सभापतींना विनंती

3093
ramdas-athawale-speech

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राज्यसभेत कामकाजाच्या पहिल्या दिवशी संसदेतील दिवंगत नेत्यांना सर्व पक्षाच्या खासदारांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे खासदार रामदास आठवले हे श्रद्धांजली वाहत भाषण करत असताना वेळेच्या कमतरतेमुळे त्यांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी रोखले. त्यावर ‘वक्तपर मेरा जरूर हे ध्यान, लेकीन मेरे भाषण पर मत लगाओ बॅन’ अशी शीघ्र कविता करत रामदास आठवले यांनी ‘मी थोडचं बोलणार आहे, फार बोलणार नाही. बोलू द्या’, अशी विनंती केली.

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राज्यसभेत दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांचे नाव पुकारण्यात आल्यानंतर पीठासीन सभापती व्यंकय्या नायडू यांनी ‘संक्षिप्त में’ असा इशारा त्यांना पहिलेच दिला होता. मात्र असा इशारा देऊनही रामदास आठवले यांचे भाषण लांबत असल्याचे सभापतींना वाटले. अखेर त्यांनी रामदास आठवले यांना मध्येच रोखत वेळची कमतरता आहे, अनेकांना बोलायचे आहे याची आठवण करून देती ‘संक्षिप्त में’ असे पुन्हा ऐकवले. त्यावर शीघ्र कविता करून ‘वक्तपर मेरा जरूर हे ध्यान, लेकीन मेरे भाषण पर मत लगाओ बॅन’ असे ते म्हणाले. त्यांच्या या शीघ्र कवितेमुळे आजूबाजूला असलेल्या खासदारांना देखील हसू रोखता आले नाही.

त्यानंतर पुढे बोलताना रामदास आठवले यांनी माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यावर देखील त्यांनी एक कविता त्यांनी केली होती आणि ती कविता म्हणत त्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली.

‘अरुण जेटली जेंटलमॅन थें,
वो राज्यसभा की शान थें,
हम उनके फॅन थें,
क्योकी वो सुस्वभावी मॅन थें।’

अरुण जेटलींबद्दलचे भाव व्यक्त केल्यानंतर रामदास आठवले आसनस्थ झाले. रामदास आठवले हे शीघ्र कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. ते कोणत्याही विषयावर बोलताना त्यावर कविता करतात. त्यांच्या भाषणात कविता नाही असं सहसा आढळत नाही. सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील तसाच अनुभव पुन्हा एकदा आला.

आपली प्रतिक्रिया द्या