
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरूच आहे. देशभरातील अनेक खेळाडूंसह राजकीय पक्षांनीही कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता योगगुरू रामदेवबाबा हे देखील उघडपणे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांना तुरुंगात टाकण्याची मागणी रामदेवबाबा यांनी केली.
जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला असून हा प्रकार लाजिरवाणा आहे. अशा लोकांना तात्काळ तुरुंगात टाकले पाहिजे. तो दररोज आपल्या माता, बहिणी आणि मुलींबद्दल घृणास्पद विधानं करतोय, हे अत्यंत निंदनीय आहे, हे पाप आहे, असेही रामदेवबाबा म्हणाले.
राजस्थानमधील भिलवाडा येथे रामदेवबाबा यांचे तीन दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतरही बृजभूषण यांना अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न रामदेवबाबा विचारण्यात आला. याला उत्तर देताना रामदेवबाबा यांनी याबाबत मी फक्त निवेदन देऊ शकतो. त्यांना तुरुंगात टाकू शकत नाही, असे म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मी राजकीयकृष्ट्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यास सक्षम असून बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर नाही. मी मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या अपंग नाही. माझ्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. मी राजकीय दृष्टीकोनातून एखादे विधान करतो, तेव्हा उलटेच होते आणि वादळ उठते, असेही ते म्हणाले. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
…तोपर्यंत जंतरमंतर सोडणार नाही!
जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि माझ्यासह इतर काही कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळेल असे वाटले होते, मात्र ही एक मोठी लढाई असल्याचे आम्हाला कळून चुकले आहे. लैंगिक शोषणाबाबत सारखं सारखं बोलणं खूप त्रासदायक असतं. त्यांना लैंगिक शोषणाबाबत कधी ओव्हरसाईट समिती, कधी पोलीस, तर कधी हिंदुस्थान ऑलिम्पिक संघ समितीसमोर बोलावे लागते. इतर मुलींप्रमाणे मलादेखील बृजभूषण सिंहांमुळे इतकी वर्षे गुपचूप सगळं सहन करावं लागलं. आमच्याकडे काहीही पर्याय नव्हता. बृजभूषण शरण सिंह यांना इतके का वाचवले जात आहे, असा सवाल करत विनेश फोगाट हिने जोपर्यंत बृजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत जंतरमंतर सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.