औसा तालूक्यातील रामेगाव झाले हागणदारीमुक्त

सामना ऑनलाईन । लातूर

केवळ २० दिवसात संपूर्ण गावच हागणदारीमुक्ती झाल्याचे अघटीत लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यात घडले आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार, आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराने केलेले सहकार्य आणि मदत, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्तपणे केलेल्या कार्याने हा इतिहास लातूर जिल्ह्यात घडला आहे. मराठवाड्यातील केवळ अल्प काळात हागणादारीमुक्त झालेले गाव होण्याचा बहुमान औसा तालूक्यातील रामेगाव या गावाने मिळवला आहे. तब्बल ३४० शौचालयांचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.

मागील कांही वर्षांपासून लातूर जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत राहतो. मागील वर्षी लातूर शहरातील पाण्याची टंचाई देशपातळीवर गाजली होती, शहराला रेल्वेने पाणी पुरवठा केल्याचे देशाने पाहिलेले होते. त्या पाश्र्वभुमिकवरच लातूर जिल्ह्यातील जलयुक्त लातूर ही चळवळ देशातच नव्हे तर परदेशापर्यंत जाऊन पोहंचली होती. लोकसहभागातून लातूर जिल्ह्यातील नद्यांमधिल गाळ काढणे, सरळीकरण करणे, ओढे सरळीकरण करण्याची कामे मोठया प्रमाणात झाली. आता लातूर जिल्ह्यात चळवळ सुरु झाली आहे ती शौचालयांचे बांधकाम करुन संपूर्ण गावच हागणदारीमुक्त करण्याची.

औसा तालूक्यातील रामेगाव हे सुमारे ४०० घरांचे आणि २२३५ लोकसंख्या असणारे गाव. मागील वर्षी या गावातील ग्रामस्थांनी ५ लाख रुपये लोकसहभाग दिला आणि ओढ्याचे खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण झालेली होती. रामेगावही हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला. गावात त्यासाठी अनेकदा बैठका, ग्रामसभा घेण्यात आली. शौचालयाच्या वापरासाठी शासन १२ हजार रुपये देते परंतू वैयक्तीक तेवढ्या रक्कमेत शौचालयाचे काम होत नाही. ही अडचण सोडवली ती आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराने त्यांनी संपूर्ण शौचालयाचे बांधकाम स्वखर्चातून करुन देण्याची तयारी दाखवली आणि एकत्रीत कामामुळे खर्च केवळ १३५०० रुपये आला.

ग्रामस्थांनी खड्डा तयार करुन देणे, साहित्याची वाहतूक स्वतः करणे, बांधकामासाठी आलेल्या गवंडी आणि त्याच्या सोबत्याचे एक दिवसाचे जेवण देणे आणि एकजण त्याच्यासोबत कामाला मदत करणे एवढेच काम केले. शासन जेंव्हा १२ हजार रुपये देईल तेंव्ही ती रक्कम आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराकडे सोपवणे यासाठी सर्वजण तयार झाले. अत्यंत कमी जागेत, घराच्या खोलीतच शोषखड्डे घेण्यात आलेले आहेत. तब्बल ३४० घरांमध्ये शौचालयाचे काम सुरु करण्यात आले ते ५ जानेवारी २०१७ रोजी आणि आज अखेर हे काम पुर्णत्वास गेले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनीही रामेगावला भेट दिली. सर्व वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आता गावात येऊन भेट देऊन पाहात आहेत. जिल्ह्यातील विविध गावांमधील सरपंचही भेटी देण्यास येत आहेत. शौचालय उभारण्याच्या चळवळीस योग्य दिशा देण्याचे काम लातूर जिल्ह्यात रामेगावमुळे शक्य झालेले आहे.

आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने लातूरसह आता विविध जिल्ह्यांमध्ये हे काम आता केले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र टिमच त्यांनी तयार केलेली आहे. लातूर जिल्ह्यासाठी १०० बांधकाम करणारे गवंडी त्यांनी उपलब्ध करुन दिलेले आहेत. केवळ २० गवंड्यांच्या मदतीने २० दिवसात ३४० शौचालयांचे काम पुर्ण करण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यातील इतर गावांमधूनही मागणी होत असल्याची माहिती मकरंद जाधव, महादेव गोमारे यांनी दिली.

या कामासाठी राजेंद्र शेळके, ग्रामसेविका भोजने, विनायक जाधव, अक्षय ढोले, नागनाथ हारेगावकर, स्वप्नील पवार, श्रीराम पवार, धीरज पाटील, हनुमंत शेळके, ओमप्रकाश पाटील, अजीत शेळके, आदिनाथ वाडकर, संजय शेळके, शाहूराज कांबळे यांनीही परिश्रम घेतले. गावचे सरपंच आणि ग्रामसेविका यांनी संयुक्तपणे शासनाचे १२ हजार रुपये लाभार्थ्य़ांना मिळाल्यानंतर ते आर्ट ऑफ लिव्हींगला परत करण्याची जबाबदारी उचलली असल्याची माहिती ग्रामसेविका भोजने यांनी दिली. गावात पुर्वी केवळ ५० शौचालये होती त्यांचा वापरही चालू होता परंतू आता शंभर टक्के शौचालये झाली असून सर्वजण त्याचा वापर करतील, असेही त्यांनी सांगीतले.