रमेश कदम यांची २५० कोटींची मालमत्ता जप्त

33

सामना प्रतिनिधी । मुंबई

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळय़ाप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची २५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मलबार हिल तसेच बोरिवली येथील भूखंडाचा समावेश असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी आज दिली.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची २५० कोटींची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. अद्याप दोन ते तीन जिह्यांमधील तपास बाकी आहे. तो पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण घोटाळय़ाचे चित्र स्पष्ट होणार आहे. रमेश कदम यांनी घेतलेल्या ६० महागडय़ा गाडय़ांचा लिलाव करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली आहे. यात ऑडी, स्कॉर्पिओ, इनोव्हा आदी गाडय़ांचा समावेश असल्याचेही दिलीप कांबळे यांनी सांगितले. रमेश कदम याचा संभाजीनगर येथील अडीच एकरचा भूखंड तसेच मलबार हिल येथे बंगला बांधण्यासाठी घेतलेला १०६ कोटी रुपयांचा भूखंडही ताब्यात घेण्यात आल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठेंनाभारतरत्नदेण्याची शिफारस

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची समाजातील सर्वच थरांतून मागणी होत आहे. अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी शिफारस राज्याकडून केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याचेही दिलीप कांबळे यांनी सांगितले. अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील घाटकोपर चिरागनगर येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. जी ५०० कुटुंबे बाधित होणार आहेत त्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या