रामगोपाल वर्मा पुन्हा बोलला

<<शिरीष कणेकर>> [email protected]

निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा मला आवडतो. फक्त त्यानं तोंड उचकटून बोलू नये एवढीच अपेक्षा आहे. पण माझ्या अपेक्षांना त्यानं भीक का घालावी? आपल्या मतांकडे जग डोळे लावून बसलंय असं त्याला मनापासून वाटत असावं. ‘ट्विटर’वरून तो नित्यनेमानं वादग्रस्त विधानं करीत असतो आणि वर ‘ट्विटर’ हा माझा व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे असंही म्हणतो. आमीर खानपासून महेश भटपर्यंत व करण जोहरपासून संजय लीला भन्साळीपर्यंत सर्वांशी त्याचा पंगा घेऊन झालाय. एक अमिताभ धरून ठेवला की बाकी कोणाशीही वैर करण्याचा आपल्याला अधिकार आहे अशी त्यानं स्वतःशी समजूत करून घेतलेली दिसते.

दोन-चार चित्रपटांचा अपवाद सोडला तर रामगोपाल वर्मानं सातत्यानं वेगळे, चांगले व वर्मास्टॅम्प असणारे चित्रपट दिले. ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘खुबसूरत’, ‘मस्त’ आणि ‘सरकार’. त्याचा पडेल ‘दौड’ हा चित्रपटही मला भावला होता.

चांगले चांगले चित्रपट निर्माण करायचे सोडून तो बोलायला का लागलाय तेच कळत नाही. आपल्या बोलण्यावर माणसं लट्टू होतात किंवा आपण फार अकलेचं बोलतो असं वाटायला तो राजकारणातही नाही. ‘26/11’नंतर ताजमहाल हॉटेलची पाहणी करायला गेलेल्या मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या टीमबरोबर रामगोपाल वर्माही गेला होता. त्यावर बोंबाबोंब झाली. परिणामी विलासरावांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली होती.

असो. आता त्याची ताजी मुक्ताफळे वाचा. महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा उदो उदो होत असताना व त्यांच्या असाधारण कर्तृत्वाला सलाम केला जात असताना रामगोपालनं ‘ट्विट’ केलं – ‘सनी लिऑन जसा आनंद देते तसा आनंद जगातील सगळय़ा महिलांनी पुरुषांना द्यावा अशी शुभेच्छा मी देतो!’

सनी लिऑन सगळ्यांनाच माहित्येय. हिंदी चित्रपटात येण्यापूर्वी ती ‘ब्ल्यू फिल्म’मध्ये गाजली होती. आजही तिच्या ‘त्या’ क्लिप्स सर्वत्र उपलब्ध आहेत. खैर तो तिचा प्रश्न आहे. तिचा इतिहास उकरून काढण्याचं आपल्याला कारण नाही, परंतु ती कुठल्या प्रकारचं सुख पुरुषांना – तेही कॅमेरासमोर – देत होती हे सर्वज्ञात आहे. आजच्या पुढारलेल्या जगातदेखील हा व्यवसाय सभ्य समाजाला मान्य नाही. ‘पॉर्नो स्टार’ म्हणून सनीसारख्या व्यावसायिक पाश्चात्य जगात लोकप्रिय व मान्यताप्राप्त असतीलही पण आपल्याकडे तशी परिस्थिती अद्याप ओढवलेली नाही. अजूनही सभ्यतेच्या कल्पना आपल्या समाजजीवनात अस्तित्वात आहेत. सनी लिऑन म्हटल्यावर आजही सर्वसामान्य माणूस कावराबावरा होतो. अल्पवयीन मुलांनी तिचे चित्रपट बघू नयेत असेच पालकांना वाटत असते. तिचा कामांध पूर्वेतिहास तिचा पिच्छा सोडत नाही.

आणि आता महिला दिनाच्या शुभेच्छा देताना रामगोपाल वर्मा म्हणतो की, सनी लिऑन पुरुषांना जसा आनंद देते तसा आनंद जगातील सगळय़ा महिलांनी पुरुषांना द्यावा ‘तसा’ आनंद? नक्की काय म्हणायचंय त्याला? तो नवऱ्याला आनंद द्यावा असं म्हणत नाही तर पुरुषांना आनंद द्यावा असं सांगतो. शिवाय नवऱ्यांना आनंद द्यावा हे या युगात बोलणारा वर्मा कोण? महिलांविषयी आदर व्यक्त करण्याची ही पद्धत? त्यांचा जन्म केवळ पुरुषांना (वर्माला अभिप्रेत असणारा) आनंद देण्यासाठी असतो काय? असं काही अश्लाघ्य बोलण्यासाठी वर्माची जीभ रेटली तरी कशी? हा जर रामगोपाल वर्माचा विनोद असेल तर त्यावर तो स्वतः सोडून कोणाला हसू येईलसं वाटत नाही. इतकी पातळी सोडून काढलेले बोल विनोद या सदरात मोडत नाहीत.रामगोपाल वर्माला त्याची किंमत मोजायला लावायला हवी, पण कोण करणार हे?

 

 

आपली प्रतिक्रिया द्या