रामलीला; कला सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठ

नमिता वारणकर, मुंबई

नवरात्राचे नऊ दिवस अनेक कलाकारांना आपली कला दाखविण्याची संधी देणारे असतात. रामलीला ही त्यापैकीच एक. रामलीला… नवरात्रोत्सवानिमित्त साजरा होणारा पारंपरिक लोकनाटय़ोत्सव… दसऱयाच्या दिवशी रामाने लंकाधिपती रावणावर विजय मिळवला होता. त्या विजयाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रामलीलेच्या खेळाला सुरुवात होते.

दहाव्या म्हणजेच दसऱयाच्या दिवशी रावण, त्याचा बंधु कुंभकर्ण आणि त्याचा पुत्र मेघनाद यांचे पुतळे जाळले जातात. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, हनुमान यांच्या भूमिका करण्यासाठी उत्तर प्रदेशातील काही कलाकार वर्षानुवर्षे मुंबईत येतात. संत तुलसीदासांनी रामलीलेच्या उत्सवाची सुरुवात केली, असे मानले जाते.

अयोध्येतील रामलीला अश्विन वद्य नवमी या तिथीला सुरू होऊन पुढे १७ दिवस चालते. दिल्ली रामलीलेकरिता प्रसिद्ध असून १९२० सालापासून ५० ठिकाणी रामलीला सादर केली जाते. काशीतील रामलीला ३० दिवस चालते. या काळात उत्तर प्रदेशातील बरेचसे कलाकार मुंबईत येतात. तेथील काही रामलीला मंडळेही आझाद मैदान, शिवाजी पार्क या ठिकाणी कार्यक्रम होतो. ठरलेल्या पात्राप्रमाणे विशेष अशी भडक वेशभूषा ते धारण करतात. यातील रामाची भूमिका साकारणाऱया कलाकाराला खूप महत्त्व असते. त्याची सर्वप्रथम पूजा करून मिरवणूक काढली जाते. त्यावेळी लोकही श्रद्धेने त्याच्या पाया पडतात आणि मगच ते पात्र आपली व्यक्तिरेखा साकारण्याकरिता येते.

डिजिटल रामलीला

आजच्या इंटरनेटच्या युगात लोक डिजिटल आणि लाईव्ह रामलीलेचा आनंदही घेऊ शकतात. डिजिटल स्क्रिनवर रावणाने लंकेतील अशोकवाटिकेची केलेली नासधूस, वृक्षांवर इकडे तिकडे पळताना हनुमान अशा रोमांचकारी दृश्यांचा अनुभव प्रेक्षकांना डिजिटल होणाऱया रामलीलेद्वारेही घेता येणार आहे.

यश सूत्रधारावर अवलंबून

रामलीलेचे यश सूत्रधारावर अवलंबून असते. कारण तो या लोकनाटय़ात प्रत्येक पात्राच्या तोंडी असलेल्या संवादाचे आणि कलाकारांचे प्रतिनिधित्व करत असतो. यासोबतच त्याला रंगमंचावरील व्यवसायावरही लक्ष द्यावे लागते. प्रत्येक रामलीला लोकनाटय़ाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीरामाचे पूजन करतात. देवाच्या मुकुटाचे पूजन होते आणि नंतर आरती केली जाते

आपली प्रतिक्रिया द्या