रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव (87) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. हृदयाशी संबंधित समस्येमुळे 5 जूनपासून हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिह्यातील पेडापरुपुडी गावात 16 नोव्हेंबर 1936 रोजी शेतकऱयाच्या कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटी या जगातील सर्वात मोठय़ा थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयूरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या पंपन्या आहेत. पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल रामोजी राव यांना 2016 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, रामोजी राव यांच्या पार्थिवावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले. तिथे कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.