बंदी असतानाही कत्तलीसाठी जनावरांची सर्रास वाहतूक, नगर एमआयडीसी पोलिसांकडून 58 जनावरांची सुटका

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. तसेच, सध्या लम्पी स्किन संसर्गामुळे जनावरांची वाहतूक करण्यात बंदी घालण्यात आली आहे. तरीही जनावरांची वाहतूक सुरूच असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे समोर आले आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये 61 जनावरांची सुटका करण्यात आली असून, त्यातील तीन जनावरे मृत आढळली आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

कैफ आलीम काकर (वय 18), साबीर समीर चौगुले (वय 19, दोघे रा. बेल्हे, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे), जाकीर रशीद शेख (वय 35, रा. घोडेगाव, ता. नेवासा), शहेबाज गुलामसाबीर सय्यद (वय 18, रा. चांदा, ता. नेवासा), तर दुसऱया कारवाईत शेख युनिस फत्ते मोहम्मद (वय 33), मुख्तदिर अमिन कुरेशी (दोघे रा. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. तसेच, लम्पी संसर्गामुळे जनावरांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तरीही जनावरे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी नगर-मनमाड महामार्गावर सापळा रचून आरोपींचा पाठलाग केला. यावेळी आरोपींच्या पीकअप वाहनातून जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या जनावरांबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच ही जनावरे चोरून आणून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी वरील चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱया कारवाईत पीकअप जीप पकडून त्यातील जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी संगमनेर येथील दोनजणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून दोन लाख 32 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.