सर्व विकण्याचा सपाटा लावला असताना देश ‘स्वावलंबी’ बनणार कसा? काँग्रेसचा मोदींना सवाल

1093

हिंदुस्थानच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. या संबोधनादरम्यान मोदींनी ‘स्वावलंबी’ बनण्याचा नारा दिला. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी लोकांनी पुढे येऊन योगदान द्यावे असे आवाहन मोदींनी केले. मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने सवाल उपस्थित केला असून सर्व विकण्याचा सपाटा लावला असताना देश ‘स्वावलंबी’ बनणार कसा? असा सवाल केला आहे.

मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, स्वावलंबी हिंदुस्थानचा पाया पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि अन्य क्रांतिकारकांनी रचला होता. मात्र आता सरकार सार्वजनिक कंपन्यांची विक्री करत आहे, रेल्वे, विमानतळ यांचे खासगीकरण करत आहे. तेव्हा हा देश स्वावलंबी बनणार कसा? असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला. तसेच आज देशात बोलण्यावर, विचारांवर, कपड्यांवर स्वातंत्र्य आहे की नाही, की त्यावरही अंकुश लागला आहे? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम’ घोषणा देताना केजरीवाल यांची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, भाजपने केला हल्लाबोल

दरम्यान, लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा दिला. स्वावलंबी हिंदुस्थान म्हणजे फक्त आयात कमी करणे नाही तर आपली उत्पादन क्षमता वाढवणे, नवीन निर्मिती करणे, कौशल्य वाढवणे याचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एन-95 मस्त, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर बाहेरील देशांकडून आयात करावे लागत होते, मात्र आता आपला देश स्वयंपूर्ण झाला असून दुसऱ्या देशांना मदतही करत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच आपल्या 86 मिनिटांच्या भाषणात मोदींनी शेजारील देश पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता दहशतवाद आणि विस्तारवाद यांचा सामना करण्यास देश सक्षम असल्याचे म्हंटले.

आपली प्रतिक्रिया द्या