घाटमाथे

152

<रतिंद्र नाईक>

निसर्गाने भरभरून दिलेल्या महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांपैकी अनेक स्थळे समुद्रसपाटीपासून फार उंचावर आहेत. यामध्ये उंच पठारांसह गडकिल्ल्यांचा समावेश होतो. खरोखरच ही उंच ठिकाणे पाहण्यासारखी असून पर्यटकांनी एकदा तरी या स्थळांना भेट द्यायलाच हवी.

महाराष्ट्रात अनेक गडकिल्ल्यांसह उंच पर्यटन स्थळे असून दरवर्षी मोठय़ा संख्येने पर्यटक या स्थळांना भेट देतात. समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे निश्चितच या स्थळांवर थंडी अधिक जाणवते. या उंच डोंगरमाथ्यांवर अनेक गावेही वसल्याने या ठिकाणचे राहणीमान प्रत्येकाने अनुभवायला हवेच. सह्याद्री, कोकण, सातपुडा, माळशेज, माथेरान, महाबळेश्वर अशी सुंदर डोंगरकडा महाराष्ट्राला लाभली असून येथील अनेक पर्यटनस्थळे अद्यापही पर्यटकांच्या नकाशावर आलेली नाहीत. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंपैकी पावसाळा आणि हिवाळयात ही स्थळे पाहण्यासारखी असतात. त्यात पावसाळ्यात तर अनेक ग्रुप्स दरवर्षी ट्रेकिंगसाठी येथील डोंगर-दऱयांचा रस्ता धरतात. तेव्हा उंच कडय़ांवरून दिसणारे विहंगमय दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे असते, अशीच प्रतिक्रिया भेट देणाऱया प्रत्येकाची असते. एवढेच नव्हे तर उंच ठिकाणांवर पोहचताना दऱयाखोऱयांतून वाट शोधत गाठलेले शिखर आणि त्यातून मिळणारी अनुभूती नक्कीच जीवनात काही तरी शिकवून जाते. चला तर या महाराष्ट्रातील उंच ठिकाणांची माहिती घेऊया…

सातपुडा पर्वतरांग… महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडय़ाच्या डोंगरदऱयांत व जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवाशी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवाशींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. मोठमोठय़ा पर्वतरांगा व येथील हवामान नक्कीच अनुभवण्यासारखे असून सातपुडा पर्वतरांग पर्यटकांना नक्कीच वेगळा अनुभव देणारी ठरेल.

आंबोली घाट… सह्याद्री आणि कोकणच्या कुशीत वसलेला आंबोली घाट पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून पर्यटक येतात. उंचच उंच कडे-कपाऱयांतून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱया दुधाळ धबधब्यांमुळे अलीकडील काही वर्षांत वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध झालेला आंबोली घाट पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. धनगराने दाखविलेली पायवाट आणि त्यावर ब्रिटिशांनी तयार केलेला आंबोली घाट जवळपास सव्वाशे वर्षे ऊन-पाऊस यांचा मारा झेलत उभा आहे. ब्रिटिशांच्या बांधकाम तंत्रज्ञानाचा अजोड नमुना असलेला आंबोली घाट सर्वात सुरक्षित घाट म्हणून ओळखला जातो.

लळिंग किल्ला

बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर लळिंग हा किल्ला उभा ठाकलेला आहे. आमेर हा खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. त्यानंतर लळिंगच्या किल्ल्याचा क्रम लागतो. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. केवळ मुघल वा पेशवाईचाच नव्हे तर हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ातील अनेक घटनांची साक्ष हा किल्ला देतो.

महाबळेश्वर

सातारा जिल्हातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार ४३९ फूट उंचीवर महाबळेश्वर असल्याने येथील तापमानात नेहमीच गारवा असतो.  महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.

माथेरान

रायगड जिल्हय़ातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान मुंबई-पुण्यातील पर्यटकांना नेहमीच खुणावते. विस्तृत प्रदेश, इथली हिरवळ आणि वातावरणातील गारवा अनुभवावा असाच आहे. याशिवाय येथील विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक माथेरानला भेट देतात. माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेनमधून पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

माळशेज घाट

पश्चिम घाटांपैकी एक असलेला माळशेज घाट पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला असतो. येथील नागमोडी वळणे आणि कडेकपारीतून प्रवास करताना निसर्गाच्या विलोभनीय दृश्यांची तर पर्यटक नेहमीच तारीफ करतात. पावसाळय़ात फेसाळणारे धबधबे पर्यटकांना साद घालतात. येथील उंच शिखरे आभाळाला साद घालतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या