मिठाची रांगोळी

हानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरची बेताची परिस्थिती असल्याने त्यांची आवड जोपासता आली नाही. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. जगात अशक्य असे काहीच नाही हे त्यांनी दाखवून दिले. चित्रकलेचे शिक्षण नसताना केवळ अन्य प्रदर्शन बघून त्यांनी ही आवड जोपासली. आज मिठाच्या रांगोळीमधून ते समाजप्रबोधन करत असतात. हा अवलिया म्हणजे कल्याणचे रांगोळी कलाकार शिवाजी चौघुले.

वेळ मिळेल तेव्हा ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये जाऊन तेथे भरलेले प्रदर्शन बघतच त्यांची ही कला जोपासली. सध्या ते आरोग्य सेवा संचालनात शिपाई पदावर कार्यरत आहेत. आपल्या कार्यालयात आरोग्यपर संदेश चित्राद्वारे त्यांच्या फलकावर काढत असतात. या कामात त्यांच्या सहकाऱ्यांचाच त्यांना मोठा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मिठाच्या रांगोळीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातून ते समाज प्रबोधन करण्याचे काम करतात. त्यांच्या रांगोळीचे सर्व स्तरांतून कौतुकही होत आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून मिठाची रांगोळी काढण्यासाठी आमंत्रणे येत असतात. शिवाय त्यांची ही कला इतरांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा फायदा गरजू लोकांनाही व्हावा याकरता ते कार्यशाळेचे आयोजनही करणार आहेत. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमातून त्यांची कला लोकांसमोर यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. नेत्रदान हे श्रेष्ठदान या विषयाला अनुसरून त्यांनी ५० किलो मिठापासून रांगोळी रेखाटली आहे. आता मिठापासून तयार होणाऱ्या कलाकृतीची लिम्का बुकने दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या