नववर्ष स्वागतासाठी ‘महारांगोळी’ने गोदाकाठ सजले

155

सामना प्रतिनिधी । नाशिक

नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आज नाशिकच्या गोदाकाठावर २०० बाय १०० फुट आकाराची महारांगोळी काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. मंगळवारी गुढीपाडवा सण साजरा होणार असून, या पाश्र्वभूमीवर आकर्षक महारांगोळीने सजलेल्या गोदाकाठाचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

गोदाकाठावरील श्री नारोशंकर मंदिरासमोर भाजी बाजार पटांगणात आज सकाळी ६ वाजता सवाशे महिला व काही पुरुषांनी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. प्रारंभी गुढी उभारण्यात आली. तीन तासात त्यांनी ही रांगोळी पूर्ण केली. प्रसिद्ध रांगोळीकार नीलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे डिझाईन ठरविण्यात आले. ‘संतांची मांदिआळी’ हा रांगोळीचा विषय असून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य दर्शविण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. या रांगोळीत श्री विठ्ठल, तुळशी वृंदावन, वाळवंट, दिंडी, रिंगण सोहळा, संत, वारकरी, अभंग, चंद्रभागा नदी, टाळ-मृदुंग साकारले आहेत. यासाठी तब्बल आठ टन रांगोळी व रंग वापरण्यात आले आहेत. भव्य रांगोळीने सजलेला गोदाकाठ पाहून सर्वांनीच रांगोळीकारांचे कौतुक केले.

नववर्ष स्वागतासाठी मागील वर्षापासून महावादन आणि महारांगोळी हा उपक्रम आयोजित केला जात आहे. मागील वर्षी याच चमूने १२५ बाय १२५ फुटी रांगोळी काढली होती. यंदा या उपक्रमासाठी महिलांना दीड महिना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती नीलेश देशपांडे यांनी दिली. हा उपक्रम राबविण्यासाठी देशपांडे यांच्यासह आसावरी धर्माधिकारी, वीणा गायधनी, ओंकार टिळे व यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या