धन्यवाद हिंदुस्थान! आर्थिक संकटात साथ देण्यासाठी श्रीलंकेने मानले हिंदुस्थानचे आभार

कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने हिंदुस्थानचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या कर्जामुळे श्रीलंकेला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला मात्र अद्याप मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

श्रीलंका या देशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊन झाल्यामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला. पर्यटन ठप्प झाल्यामुळे श्रीलंकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली. अखेर परदेशी चलनाचं भांडार रिकामी झाल्यामुळे एप्रिल 2022 मध्ये श्रीलंका कर्जाचा हप्ता भरू शकला नाही. त्याचा परिणाम श्रीलंकेच्या राजकीय घडीवरही झाला.

या संकटातून बाहेर येण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे धाव घेतली होती. श्रीलंकेची विनंती मान्य करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळाने श्रीलंकेला 2.9 अब्ज डॉलर इतकं बेलआउट पॅकेज जाहीर केलं. श्रीलंकेने या संकटावेळी सर्वतोपरी आर्थिक मदतीचं आश्वासन देणाऱ्या हिंदुस्थानचे आभार मानले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी धन्यवाद हिंदुस्थान असं म्हणून कृतज्ञता व्यक्त केली आहे.