रणजीच्या ‘हिरो’चे थेम्स नदी किनारी भन्नाट प्रपोज

सामना ऑनलाईन । लंडन

कर्नाटकचा सलामीवीर खेळाडू मयंक अग्रवालने सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मयंक लंडनमधील थेम्स नदीकिनारी असणाऱ्या काचेच्या खोलीमध्ये (व्ह्यू पॉइंट) बसून त्याच्या प्रेयसीला प्रपोज करताना दिसत आहे. या फोटोखाली त्याने ‘फायनली वो मान गई’। असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही मयंकने लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मयंकने या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ११६० धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. मात्र विदर्भाच्या संघाविरोधात रोमहर्षक सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. परिणामी कर्नाटकचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र या पराभवाचे दु:ख बाजूला सारत कर्नाटकचा हा हिरो प्रेयसीसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.