दिल्लीची अंतिम फेरीत धडक

सामना प्रतिनिधी । पुणे

दिल्लीने उपांत्य लढतीत बंगालवर एक डाव व २६ धावांनी विजय मिळवून रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. नवदीप सैनी व कुलवंत खेजरोलिया यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने तिसऱयाच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केले हे विशेष. पहिल्या डावात ३ व दुसऱया डावात ४ बळी टिपणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सामन्याचा मानकरी ठरला.

विदर्भाच्या फलंदाजांची ‘कसोटी’

विदर्भाला १८५ धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकने १००.५ षटकांत ३०१ धावसंख्या उभारून पहिल्या डावात ११६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. करूण नायरचे (१५३) दीडशतक व सी. गौतमचे (७३) अर्धशतक व कर्णधार विनय कुमारच्या २१ धावांच्या बळावर कर्नाटकने तीनशेचा टप्पा ओलांडला. विदर्भाकडून रजनीश गुरबाणीने ५, तर उमेश यादवने ४ फलंदाज बाद केले. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या विदर्भाने दुसऱया डावात उर्वरित ४७ षटकांच्या खेळात ४ बाद १९५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांच्याकडे आता ७९ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज शिल्लक आहेत.